![]()
वेडिंग फोटोग्राफीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वाढता वापर, आधुनिक तंत्रज्ञान आणि छायाचित्रणातील बदलत्या कार्यपद्धतींची माहिती देण्यासाठी आयोजित ‘एआय आणि वेडिंग फोटोग्राफी’ या मोफत सेमिनारला छायाचित्रकारांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सयाजी हॉटेल येथे पार पडलेल्या या सेमिनारमध्ये सुमारे 160 छायाचित्रकारांनी सहभाग नोंदविला. औरंगाबाद फोटोग्राफर असोसिएशन, वर्धमान फोटो एम्पोरियम आणि प्रोएवी प्रोफेशनल ऑडिओ व्हिज्युअल यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रॉबिन सैनी यांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन प्रसिद्ध पुरस्कारविजेते वेडिंग फोटोग्राफर रॉबिन सैनी यांनी उपस्थित छायाचित्रकारांना मार्गदर्शन केले. विविध एआय सॉफ्टवेअरच्या मदतीने दर्जेदार छायाचित्रे व व्हिडिओ तयार करणे, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आणि कामाचा वेग व गुणवत्ता वाढवण्यासाठी योग्य ‘वर्कफ्लो’ कसा विकसित करावा, याचे प्रात्यक्षिक त्यांनी दाखवले. व्हिडिओ शूटिंग, ध्वनिमुद्रण आणि अल्बम निर्मितीमध्ये एआयची उपयुक्तता स्पष्ट करत त्यांनी कामातील बारकाव्यांवर भर दिला. मोबाईलवरून सहज लाईव्ह स्ट्रीमिंग: बीटा सॉफ्टवेअरचे अनावरण या प्रसंगी गणेश उमरीकर यांनी स्वतः विकसित केलेल्या बीटा सॉफ्टवेअरची माहिती दिली. या सॉफ्टवेअरमुळे लग्नसमारंभ, राजकीय सभा किंवा इतर कार्यक्रमांचे मोठ्या कॅमेऱ्यांशिवाय, केवळ मोबाईल आणि एका लिंकच्या साहाय्याने थेट प्रक्षेपण (लाईव्ह स्ट्रीमिंग) करणे शक्य होणार आहे. हे सॉफ्टवेअर सध्या छायाचित्रकारांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वर्धमान फोटो एम्पोरियमचे निकेत जैन यांनी स्पष्ट केले की, “येत्या काळात एआयशिवाय फोटोग्राफीचे काम पूर्ण होणे कठीण आहे. त्यामुळे प्रत्येक छायाचित्रकाराने हे नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे आणि आवश्यक साधने बाळगणे ही काळाची गरज बनली आहे.” मान्यवरांचा सत्कार व उपस्थिती कार्यक्रमात अमोल बोराडे, गणेश भेरे आणि पुरुषोत्तम देशपांडे यांच्या हस्ते रॉबिन सैनी, गणेश उमरीकर आणि निकेत जैन यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचा परिचय ऋषिकेश होशीग यांनी करून दिला, तर सूत्रसंचालन रमेश रावळे यांनी केले. या सेमिनारला औरंगाबाद फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष किशोर निकम यांच्यासह शहर व परिसरातील बहुसंख्येने छायाचित्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Source link
वेडिंग फोटोग्राफीत 'एआय'ची क्रांती:मोबाईलवरून होणार थेट प्रक्षेपण; छत्रपती संभाजीनगरमध्ये 160 छायाचित्रकारांसाठी विशेष सेमिनार