![]()
कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व आता अजिंक्य शिंदे करणार आहेत. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असताना व्हिडीओ शेअर करून ही घोषणा केली. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जंतरमंतर येथे आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या सीजेपीच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आंदोलनाच्या नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर अभिजीत दिपके यांनी अजिंक्य शिंदे यांच्याकडे आंदोलनाची सूत्रे सोपवली. अभिजीत दिपके यांचे विमान शनिवारी सकाळी दिल्ली विमानतळावर उतरताच पोलिसांचे पथक विमानात दाखल झाले. पोलिसांनी अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर या तिघांना बसमधून अज्ञातस्थळी नेण्यात आले. सीजेपीच्या तीन प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतल्यामुळे दिल्लीतील जंतरमंतर येथे होणाऱ्या आंदोलनाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अजिंक्य शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार काम करा- अभिजीत दिपके या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांनी व्हिडीओच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संदेश दिला. “आशुतोष रांका, सौरव दास आणि मला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आमच्यानंतर अजिंक्य शिंदे आंदोलनाचे नेतृत्व करेल. तुम्ही हा व्हिडीओ पाहत असाल, तर अजिंक्य शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार काम करा. आमच्या तिघांनंतर आंदोलनाची सूत्रे तो सांभाळेल,” असे दिपके यांनी म्हटले. त्यामुळे प्रमुख नेत्यांना अटक झाल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवण्याची जबाबदारी आता अजिंक्य शिंदे यांच्यावर आली आहे. कोण आहेत अजिंक्य शिंदे? ३५ वर्षीय अजिंक्य शिंदे हे कॉकरोच जनता पार्टीचे राष्ट्रीय संघटन सचिव म्हणून कार्यरत आहेत. पक्षातील त्यांची भूमिका भाजपचे बी. एल. संतोष आणि काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल यांच्या संघटनात्मक जबाबदाऱ्यांशी तुलना करण्याजोगी असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, अजिंक्य शिंदे आणि आम आदमी पार्टी यांच्यातील कथित संबंधांवरूनही चर्चा सुरू झाली आहे. अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्यानंतर पक्षाच्या आंदोलनाची महत्त्वाची जबाबदारी स्वीकारल्याने शिंदे सध्या चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर करण्यात येणाऱ्या दाव्यांनुसार, अजिंक्य शिंदे यापूर्वी महाराष्ट्रात आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीचे संयोजक म्हणून कार्यरत होते. तसेच, AAP च्या प्रमुख नेत्यांसोबतचे त्यांचे फोटोही सोशल मीडिया हँडल्सवरून शेअर केले जात आहेत. जुलै 2022 मधील एक पोस्टरही प्रसारित होत असून, त्यात अरविंद केजरीवाल आणि पक्षातील इतर नेत्यांसोबत अजिंक्य शिंदे यांचे अनेक फोटो असल्याचे दावे केले जात आहेत. त्यामुळे त्यांच्या पूर्वीच्या राजकीय कार्याचा आणि ‘आप’ सोबतच्या कथित संबंधांचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे.
Source link
CJP च्या आंदोलनाची धुरा सांभाळणारे अजिंक्य शिंदे कोण?:अभिजीत दिपकेंच्या अटकेनंतर नव्या नेतृत्वात आंदोलन; AAP कनेक्शन असल्याची चर्चा