Headlines

पुण्यात प्रेमसंबंधांचा भयानक शेवट:इंजिनिअर प्रियकराकडून प्रेयसीची मारहाणीत हत्या, मृतदेहाशेजारी रात्रभर बसून राहिला




राज्याची आयटी हब म्हणून ओळख असलेल्या पुण्यातील हिंजवडी परिसरात प्रेमसंबंधातून घडलेल्या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. एकमेकांच्या प्रेमात असलेले आणि लग्न करून संसार थाटण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इंजिनिअर तरुण-तरुणीच्या नात्याचा अतिशय दुर्दैवी शेवट झाला. चारित्र्यावरून निर्माण झालेला संशय आणि त्यातून वारंवार होणारे वाद अखेर एका तरुणीच्या जीवावर बेतले. प्रियकराने केलेल्या बेदम मारहाणीत प्रेयसीचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, तिचा मृत्यू झाल्यानंतरही आरोपी रात्रभर तिच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने स्वतः पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून हत्येची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. मृत तरुणीचे नाव कोमल डहाके असून आरोपी प्रियकराचे नाव शुभम ज्ञानेश्वर कालबांडे असे आहे. दोघेही उच्चशिक्षित असून पुण्यातील नामांकित आयटी कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होते. शुभम हा हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीत, तर कोमल विप्रो कंपनीत कार्यरत होती. कामाच्या निमित्ताने पुण्यात स्थायिक झालेल्या या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ते एकत्र राहत होते. त्यांच्या प्रेमसंबंधांची माहिती दोन्ही कुटुंबीयांनाही होती. एवढेच नव्हे, तर त्यांच्या लग्नालाही कुटुंबीयांची संमती होती. त्यामुळे लवकरच विवाह करून एकत्र आयुष्य सुरू करण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू होती. संशयातून वारंवार वाद, अखेर हिंसक संघर्ष मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. शुभमचे अन्य कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय कोमलला होता. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. सुरुवातीला किरकोळ स्वरूपात होणारे हे वाद हळूहळू वाढत गेले. एकमेकांवरील विश्वास कमी झाल्याने त्यांच्यातील तणावही वाढला होता. घटनेच्या रात्रीही याच संशयाच्या कारणावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. बोलाचालीतून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक मारहाणीत झाले. संतापाच्या भरात शुभमने कोमलला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. तिच्या डोक्यावर आणि गळ्याच्या भागावर लाथाबुक्क्यांनी वार करण्यात आले. या मारहाणीत कोमल गंभीर जखमी झाली. ती बेशुद्ध पडली आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला. मृतदेहाशेजारी रात्रभर बसून राहिला या घटनेतील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे कोमलचा मृत्यू झाल्यानंतरही शुभमने तातडीने पोलिसांना किंवा वैद्यकीय मदत यंत्रणेला माहिती दिली नाही. तो रात्रभर तिच्या मृतदेहाशेजारी बसून राहिल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने पोलिसांच्या 112 या आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांकावर फोन केला. आपण आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची माहिती त्याने स्वतः पोलिसांना दिली. या फोननंतर हिंजवडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संबंधित ठिकाणी पोहोचल्यानंतर पोलिसांना कोमल निपचित अवस्थेत पडलेली आढळली. पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आरोपीला अटक, हिंजवडी पोलिसांकडून तपास सुरू घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हिंजवडी पोलिसांनी शुभम ज्ञानेश्वर कालबांडे याला ताब्यात घेत अटक केली आहे. या प्रकरणात नेमका वाद कशामुळे झाला, मारहाणीची घटना कशी घडली आणि मृत्यूच्या आधी तसेच त्यानंतर काय घडले, याचा पोलीस तपास करत आहेत. तसेच दोघांच्या नात्यातील वादाची पार्श्वभूमी आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचीही चौकशी केली जात आहे. दरम्यान, दोघेही उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत होते. त्यांच्या लग्नाला दोन्ही कुटुंबीयांची संमती असतानाही नात्यातील संशय आणि वादातून ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एकत्र आयुष्य जगण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या दोघांच्या नात्याचा असा रक्तरंजित शेवट झाल्याने हिंजवडीतील या घटनेने पुन्हा एकदा सर्वांनाच हादरवून सोडले आहे. हेही वाचा…. शंभूराज देसाईंनी महायुतीचा धर्म पाळला नाही:जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमच्या अर्जुन काळेंना पाडण्यासाठी प्रयत्न केले – जयकुमार गोरे यांचा गंभीर आरोप सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदाच्या निवडीनंतर ग्रामविकास मंत्री तथा भाजप नेते जयकुमार गोरे आणि पालकमंत्री तथा शिवसेना नेते शंभूराज देसाई यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. गोंदवले येथे बोलताना जयकुमार गोरे यांनी शंभूराज देसाई यांच्यावर थेट निशाणा साधत त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नसल्याचा आरोप केला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या एका संचालकाला पाडण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचा दावा करत, हे शंभूराज देसाई यांना शोभते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच जिल्हा बँकेतील यापूर्वीचे कथित गैरव्यवहार बाहेर काढण्याचा इशारा देत 100 कोटींचे सॉफ्टवेअर आणि 100 कोटींचे लॅपटॉप कुठे गेले, याचा शोध घेणार असल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले. सविस्तर वाचा…..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *