Headlines

पुण्यात महिला पोलिस अधिकारी ज्योती तांबे लाचखोरीच्या प्रकरणी अटकेत:50 हजारांची लाच मागणे पडले महागात, एसीबीची बावधानमध्ये कारवाई




पिंपरी-चिंचवडमधील बावधान पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली आहे. एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ज्योती पांडुरंग तांबे (वय 41) असे अटक करण्यात आलेल्या महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी एका 29 वर्षीय तरुणाने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकांविरुद्ध बावधान पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तपास अधिकारी म्हणून मदत करण्यासाठी, नातेवाईकांना अटक टाळण्यासाठी आणि न्यायालयात दोषारोपपत्र लवकरात लवकर दाखल करण्यासाठी तांबे यांनी तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर, विभागाने पडताळणी केली. या पडताळणीत ज्योती तांबे यांनी 50 हजार रुपयांपैकी 10 किंवा 5 हजार रुपये कमी करून उर्वरित 40 हजार किंवा 45 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर, ज्योती तांबे यांच्याविरुद्ध बावधान पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक नीता मिसाळ, पोलिस निरीक्षक सुहास हट्टीकर आणि त्यांच्या पथकाने केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्यास एसीबीच्या टोल फ्री क्रमांक किंवा व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *