![]()
स्टेशन मास्टर्सच्या प्रलंबित मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या पुणे मंडळाने शुक्रवारी, २० नोव्हेंबरला आंदोलन केले. पुणे रेल्वे विभागीय व्यवस्थापक कार्यालयासमोर शांततापूर्ण धरणे आंदोलन करण्यात आले. रिक्त पदे तातडीने भरणे, अतिरिक्त कामाचे तास कमी करणे, अन्यायकारक चार्जशीट मागे घेणे आणि विनाकारण होणाऱ्या बदल्या थांबवणे, अशा मागण्या संघटनेने केल्या. आंदोलनात ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनचे राष्ट्रीय महामंत्री धनंजय चंद्रात्रे, अध्यक्ष पुरुषोत्तम सिंग आणि पुणे मंडळाचे सचिव दिनेश कांबळे सहभागी झाले. संघटनेच्या म्हणण्यानुसार, पुणे मंडळातील स्टेशन मास्टर्स आणि पॉइंट्समनची अनेक पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे सध्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे. एका कर्मचाऱ्याला अनेक जणांचे काम करावे लागत आहे. कर्मचाऱ्यांना अनेकदा १२ तासांपेक्षा जास्त वेळ काम करावे लागते. याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे संघटनेने सांगितले. रिक्त पदे भरून मनुष्यबळाची कमतरता दूर करण्याची मागणी करण्यात आली. किरकोळ चुकांसाठी स्टेशन मास्टर्सना चार्जशीट देणे आणि ट्रेन उशिरा धावल्यास एकतर्फी कारवाई करणे, यावर संघटनेने आक्षेप घेतला. मूळ कारणांची चौकशी न करता कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले जात असल्याचेही संघटनेने म्हटले. गेल्या दोन ते तीन वर्षांतील चार्जशीटचा आढावा घेऊन त्या रद्द कराव्यात, तसेच समुपदेशन आणि प्रशिक्षणातून कामकाजात सुधारणा करावी, अशी मागणी करण्यात आली. काही महत्त्वाच्या आणि संवेदनशील रेल्वे स्थानकांवर दुसऱ्या स्टेशन मास्टरची नियुक्ती करावी. १२ तासांच्या ड्युटीऐवजी सहा तासांची ड्युटी लागू करावी, अशी मागणीही करण्यात आली. महिला स्टेशन मास्टर्ससाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष आणि स्वच्छतागृहांची सुविधा देण्याची मागणी करण्यात आली. विनाकारण होणाऱ्या बदल्या थांबवून एचआरएमएस प्रणालीअंतर्गत पारदर्शक आणि समान बदली धोरण राबवावे, विभागीय स्टेशन मास्टर परीक्षेची प्रक्रिया जलद करावी आणि नगर-बीड विभागासह सिरसाई स्थानकाचा रोस्टर लागू करावा, असेही संघटनेने म्हटले. आंदोलनाच्या यशस्वितेसाठी कृष्ण मुरारी, शकील इनामदार, सुधीर गरुड, विजय पाटील, सूर्यकमल यादव, अर्जुन कुमार, राज सोनवणे आणि अनिल तिवारी यांनी परिश्रम घेतले.
Source link
पुण्यात स्टेशन मास्टर्सनी मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले:रिक्त पदे भरणे, ड्युटीचे तास कमी करणे आणि बदल्या थांबवण्याची मागणी