Headlines

पुण्यात 37 सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई:लैंगिक अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना 15 दिवस ते 1 महिना कोठडीत टाकणार!




पुणे शहरात महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. मागील 10 वर्षांतील गुन्हेगारी नोंदी तपासल्यानंतर शहरात 37 असे सराईत गुन्हेगार आढळले आहेत, ज्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. या सर्व 37 गुन्हेगारांवर मंगळवारपासून प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त पंकज देशमुख यांनी दिली. या कारवाईचा उद्देश वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर वचक निर्माण करणे आणि महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हा आहे. एकीकडे शहर पोलिस सराईत गुन्हेगारांची यादी तयार करत असतानाच, पुणे ग्रामीण पोलिसांनी नसरापूर येथे एका तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या 65 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. भीमराव कांबळे असे या आरोपीचे नाव असून, त्याने शुक्रवारी पुणे-सातारा रस्त्यावरील नसरापूर गावातील एका गोठ्यात या मुलीवर अत्याचार केला आणि तिची हत्या केली. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवालानुसार मुलीचा मृत्यू गुदमरल्याने झाला आहे. आरोपीने मुलीच्या तोंडात कापडाचा बोळा कोंडून तिला मारले होते. तसेच तिच्या डोक्यावरही जखमा आढळल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी कांबळे याला यापूर्वी दोन लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत अटक झाली होती, मात्र त्यातून त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. पुणे शहर पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत आणखी 193 अशा व्यक्तींची ओळख पटली आहे, ज्यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांसोबतच चोरी आणि शरीराविरुद्धच्या इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या सर्व गुन्हेगारांची नावे आणि पत्ते संबंधित स्थानिक पोलिस ठाण्यांना कळवण्यात आले आहेत. अतिरिक्त पोलिस आयुक्त पंकज देशमुख म्हणाले की, या गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची कारवाई केली जाईल, ज्यामध्ये त्यांना 15 दिवस ते एक महिन्यापर्यंत कारागृहात ठेवले जाऊ शकते. याशिवाय, त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र लिहून घेतले जाईल. पोलिसांच्या या निर्णयामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *