Headlines

प्रत्येक देवस्थानात वृक्ष हवेत:अभिनेता सयाजी शिंदे यांचा अभिनव संकल्प, तुळजाभवानी मंदिरापासून ‘वृक्षप्रसाद’ योजनेला सुरुवात




राज्यातील देवस्थानांमध्ये भाविकांना केवळ धार्मिक प्रसाद न देता पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ‘वृक्षप्रसाद’ योजना सुरू करण्याचा मानस असल्याचे अभिनेते आणि पर्यावरण कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी मंदिरापासून या संकल्पनेला सुरुवात झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक देवस्थानात देशी वृक्षांची रोपे भाविकांना देऊन त्यांचे संगोपन करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे. सयाजी शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना धाराशिवमधील वृक्षलागवड उपक्रम, तुळजाभवानी मंदिरातील ‘वृक्षप्रसाद’ योजना आणि राज्यभर देवराई उभारण्याच्या आगामी नियोजनाची माहिती दिली. तुळजाभवानी मंदिरातून ‘वृक्षप्रसाद’ योजनेला सुरुवात शिंदे यांनी सांगितले की, गेल्या सुमारे 10 वर्षांपासून प्रत्येक देवस्थानात वृक्षप्रसाद योजना सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून, संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून ही संकल्पना पुढे नेण्यात आली. तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे. मंदिर संस्थानची स्थापना सार्वजनिक न्यास म्हणून 1962 मध्ये झाली असून, येथे देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. याच पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिरात भाविकांना देशी प्रजातींची 5 ते 10 प्रकारची रोपे ‘वृक्षप्रसाद’ म्हणून देण्याची योजना सुरू करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, मंदिरात दररोज मोठ्या संख्येने अभिषेक होतात. या धार्मिक प्रक्रियेशी वृक्षसंवर्धन जोडल्यास मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पर्यावरणाचा संदेश पोहोचू शकतो. ही योजना देवस्थान आणि शासनाच्या माध्यमातून राबवली जात असून, ती योग्य पद्धतीने पुढे जावी यासाठी ‘सह्याद्री देवराई’कडूनही आवश्यक सहकार्य केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. देवस्थानातून भाविकांच्या घरी जाऊ दे झाड ‘वृक्षप्रसाद’ या संकल्पनेमागे केवळ रोपांचे वाटप करण्यापेक्षा देवस्थान आणि निसर्ग यांचे नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न असल्याचे शिंदे यांच्या भूमिकेतून स्पष्ट होते. मंदिरात येणारा भाविक प्रसादासोबत एखादे देशी झाड घेऊन घरी जाईल आणि त्याचे संगोपन करेल, अशी या उपक्रमाची संकल्पना आहे. धार्मिक स्थळांवर येणाऱ्या लाखो भाविकांच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश घराघरात पोहोचवता येऊ शकतो. त्यामुळे राज्यातील इतर देवस्थानांमध्येही अशी योजना राबवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. 5 एकरांच्या 5 देवराया उभारण्याचा प्रस्ताव तुळजापूर परिसरात 5 एकरांच्या 5 देवराया निर्माण करण्याचे नियोजनही करण्यात येत आहे. यासाठी विविध कंपन्यांकडून सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून मदत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. इंडियन ऑइल, रिलायन्ससह काही कंपन्यांच्या प्रतिनिधींशी याबाबत चर्चा झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. या प्रकल्पांसाठी प्रस्ताव तयार करून संबंधित कंपन्यांकडे सादर केले जाणार आहेत. त्यातील काही प्रस्तावांना सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. देवराई उभारताना देशी वृक्षांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. स्थानिक हवामान, पाण्याची उपलब्धता आणि परिसराची गरज लक्षात घेऊन वृक्षांची निवड करण्यावर भर दिला जाणार आहे. एका रात्रीत यश मिळत नाही धाराशिवमधील मोठ्या वृक्षलागवड मोहिमेबाबत बोलताना सयाजी शिंदे यांनी केवळ मोठ्या संख्येने झाडे लावण्यापेक्षा ती किती जगली, त्यांची वाढ कशी झाली आणि त्यांचे संगोपन कसे झाले, हे अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगितले. याच कारणामुळे धाराशिवमधील वृक्षलागवड उपक्रमाबाबत सुरुवातीला आपण साशंक होतो, असे त्यांनी सांगितले. मात्र, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती घेतल्यानंतर आणि प्रत्यक्ष कामाची पाहणी केल्यानंतर या उपक्रमाबाबत विश्वास निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘कोणीही एका रात्रीत यशस्वी होत नाही. एखाद्या कामाचा 10-15 वर्षांचा अनुभव आणि त्याचा परिणाम पाहावा लागतो,’ या भूमिकेतून त्यांनी वृक्षलागवडीतील सातत्य आणि संगोपनाचे महत्त्व अधोरेखित केले. आईच्या स्मरणार्थ सुरू केलेला प्रवास सयाजी शिंदे यांच्या पर्यावरणविषयक कामामागे त्यांच्या आईच्या स्मृतीची भावनिक जोड आहे. आईच्या स्मरणार्थ त्यांनी वृक्षलागवडीचा आणि देवराई निर्मितीचा संकल्प केला. ‘आई मला माता आणि धरतीमाता यात दिसावी,’ या भावनेतून त्यांनी हा प्रवास सुरू केल्याचे ते सांगतात. ‘सह्याद्री देवराई’च्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील विविध भागांत देशी वृक्षांचे संवर्धन, देवराई निर्मिती आणि वृक्षांचे पुनर्रोपण यासाठी काम केले आहे. या प्रकल्पाचा भर केवळ झाडे लावण्यावर नसून ती जगवण्यावरही आहे. देशी आणि औषधी वनस्पतींचे संवर्धन, जुन्या झाडांचे पुनर्रोपण आणि उजाड जमिनीवर देवराई निर्माण करणे अशी विविध कामे या माध्यमातून केली जातात. शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या 10 वर्षांत सुमारे 40 देवराया उभारण्याच्या दिशेने काम झाले आहे. आता तुळजापूर परिसरातील आणखी 5 देवरायांमुळे हा उपक्रम पुढे जाणार आहे. देशी झाडेच लावली पाहिजेत वृक्षलागवड करताना परदेशी किंवा स्थानिक पर्यावरणाशी विसंगत प्रजाती लावण्यापेक्षा स्थानिक आणि देशी प्रजातींचे संवर्धन करण्यावर शिंदे सातत्याने भर देत आहेत. यापूर्वीही त्यांनी देशी वृक्षांच्या रोपवाटिका आणि देशी वृक्षांच्या देवराया निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या मते, वृक्षलागवड ही केवळ एखाद्या दिवसाची मोहीम न राहता दीर्घकालीन पर्यावरणीय चळवळ बनणे गरजेचे आहे. झाड लावल्यानंतर त्याला पाणी, संरक्षण आणि योग्य देखभाल मिळाली तरच वृक्षलागवडीचा खरा उद्देश साध्य होऊ शकतो. कंपन्यांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी ठरणार महत्त्वाचा तुळजापूर परिसरातील देवराई प्रकल्पांसाठी कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर करण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर देशी वृक्षांची लागवड, पाण्याची व्यवस्था आणि देखभाल करणे शक्य होणार आहे. दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 5 देवरायांसाठी कंपन्यांकडून सामाजिक उत्तरदायित्व निधी मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. काही कंपन्यांकडून प्रत्यक्ष कामासाठी पुढाकार घेतला जाण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. सयाजी शिंदे यांच्या पर्यावरणविषयक उपक्रमांना यापूर्वीही विविध ठिकाणी प्रतिसाद मिळाला आहे. बीडमधील पालवन परिसरात मोठ्या क्षेत्रावर देवराई प्रकल्प उभारण्यात आला असून, तेथे मोठ्या संख्येने विविध प्रजातींची लागवड करण्यात आली आहे. देवस्थान, भक्ती आणि पर्यावरणाचा संगम धार्मिक श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धन यांची सांगड घालण्याचा प्रयत्न म्हणून ‘वृक्षप्रसाद’ योजनेकडे पाहिले जात आहे. मंदिरातून घरी नेलेले रोप भाविकाने वाढवले, तर एका धार्मिक उपक्रमाचे रूपांतर दीर्घकालीन पर्यावरण संवर्धनात होऊ शकते. तुळजाभवानी मंदिरापासून सुरू झालेली ही संकल्पना राज्यातील इतर देवस्थानांपर्यंत पोहोचवण्याचा मानस असल्याने आगामी काळात ‘प्रसाद म्हणून रोप’ ही संकल्पना महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांवर कितपत विस्तारते, याकडे पर्यावरणप्रेमी आणि भाविकांचे लक्ष लागले आहे.] हेही वाचा… चित्रपटांचे हिरो यांच्यासमोर झिरो:काँग्रेस नेते अमित देशमुख यांचे खणखणीत भाषण, म्हणाले- ‘मांजरा’ सरकार पुढची 50 वर्षे…! “ज्या क्षेत्रामध्ये लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा विचार आला आणि त्याला सहकारमहर्षी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांच्या कर्तृत्वाची जोड मिळाली, तिथे कधीही मागे वळून पाहण्याची गरज भासली नाही. सरकारे 5, 10 किंवा 15 वर्षांत बदलतात, मात्र मांजरा परिवाराचे हे विश्वासाचे सरकार गेल्या 50 वर्षांत बदललेले नाही आणि पुढची 50 वर्षेही ते बदलणार नाही,” असे खणखणीत प्रतिपादन माजी मंत्री व काँग्रेस नेते अमित विलासराव देशमुख यांनी केले. येथे वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *