![]()
हिंगोली शहरात पालिका प्रशासनाकडून बुधवारी ता. १९ सकाळी श्रमदानातून स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. औंढा रोड भागात अवघ्या दोन तासात परिसर स्वच्छ करण्यात आला. नागरीकांनीही या अभियानात सहभागी होऊन आपापल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे. हिंगोली पालिकेच्या वतीने शहर स्वच्छ व सुंदर शहराची संकल्पना राबविण्यात येत आहेत. त्यानुसार सर्व प्रभागातील कचरा घंटागाडीच्या माध्यमातून गोळा केला जात आहे. या शिवाय शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपन करण्यात आले असून वृक्ष संगोपन केले जात आहेत. शहरातील सार्वजनिक चौकांमधून आता श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज नगराध्यक्षा रेखा श्रीराम बांगर, गटनेते श्रीराम बांगर, उपाध्यक्ष माबूद बागवान, मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली आहे. आज शहरातील औंढा नागनाथ नाका तसेच अग्रसेन चौक परिसरात सकाळी सात ते नऊ या दोन तासात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पालिकेचे सर्व कर्मचारी या अभियानात सहभागी झाले. यामध्ये उपमुख्याधिकारी प्रकाश साबळे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, स्पंदन बोराटे, प्रवीण मोहेकर, स्नेहल आवटे, अक्षय तांडेल, आकाश देशमुख यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि स्वच्छता विभागातील महिला, पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, नागरीकांनी आपापल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा, तसेच जमा झालेला कचरा घंटागाडीमध्ये टाकावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. त्यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामुहिक स्वच्छतेची शपथ घेतली. तसेच पालिकेकडून यापुढे सर्व प्रभागातून स्वच्छता मोहिम राबविली जाणार असून या अभियानात नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Source link
हिंगोली नगरपरिषदेकडून श्रमदानातून स्वच्छता मोहीम:अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा सहभाग