![]()
दिवंगत लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या डोह पुस्तकावर आधारित ‘डोहाच्या काठाशी’ हा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम सोमवारी, सादर झाला. जीवन विकास ग्रंथालय, टिळक नगर, छत्रपती संभाजीनगरच्या वतीने ‘वाचक व्यासपीठ’ बैठकीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम दर सोमवारी सायंकाळी होणार आहे. या व्यासपीठाच्या दुसर्या बैठकीत हा कार्यक्रम झाला. श्रीकांत उमरीकर आणि सोहम पिंगळीकर यांनी कुलकर्णी यांच्या लेखनावरील भाष्यासह हे सादरीकरण केले. या कार्यक्रमाला रसिकांनी उस्त्फूर्त प्रतिसाद दिला. ‘डोह’ची शैली गद्यकाव्याची आहे, अशी शैली नंतर फारशी वापरली गेली नाही, हे सांगताना उमरीकरांनी निसर्गाशी संबंधित इतर मराठी लेखनाचा आढावा घेतला. ललित गद्याकडे ताकदीच्या लेखकांनी पुरेसे लक्ष दिले नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
‘डोह’च्या पहिल्या वैशिष्ट्यपूर्ण मुखपृष्ठाचा उल्लेखही उमरीकरांनी केला. आपल्या पिढीची तरुण मंडळी डोह या पुस्तकाकडे कशी पाहतात हे सांगताना सोहम पिंगळीकर यांनी युरोपातल्या इ़प्रेशनिस्ट चळवळीचा उल्लेख केला. डोह मधलं लिखाण त्याच्याशी साधर्म्य असलेलं वाटतं, असं मत पिंगळीकर यांनी व्यक्त केलं. लेखक कुलकर्णी आणि त्यांचे दादा (वडील) यांच्यातील नात्यावर ‘डोहावर वाकलेलं आकाश’ हे सादरीकरण पिंगळीकर यांनी केलं त्याला जाणकार श्रोत्यांनी दिलखुलास दाद दिली. सुरुवातीला सादरकर्त्यांचे स्वागत प्राचार्य जीवन देसाई आणि मनोज तुळपुळे यांनी केले. ग्रंथालयाचे अध्यक्ष न्या. अंबादासराव जोशी यांची महाराष्ट्र जन सुरक्षा अधिनियम अंतर्गत स्ल्लागार मंडळाचे अध्यक्ष म्हणून राज्य शासनाने नियुक्ती केली त्याबद्दल वाचक व्यासपीठाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या बैठकीला जाणकार वाचक आणि श्रोते यांची चांगली उपस्थिती होती.
Source link
'डोहाच्या काठाशी' रसिक दंग:संभाजीनगरमध्ये 'वाचक व्यासपीठ' बैठकीत श्रीकांत उमरीकर, सोहम पिंगळीकर यांचे सादरीकरण रंगले