![]()
कळमनुरी तालुक्यातील फुटाणा शिवारातील शेतातील विंधन विहीरीची सातबारावर नोंद घेण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेतांना महिला ग्राम महसूल अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बुधवारी ता. १९ दुपारी आखाडा बाळापूर येथे रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील चुंचा येथील रहिवासी असलेल्या तक्रारदार शेतकऱ्याची फुटाणा शिवारात शेती आहे. या शेतात त्यांनी विंधन विहीर घेतली असून त्याची सातबारा व नमुना चौदावर नोंद घेऊन प्रमाणपत्र देण्याची मागणी शेतकऱ्याने ग्राम महसूल अधिकारी सुवर्णमाला सिरसाट यांच्याकडे केली होती. मात्र काही दिवस टाळाटाळ केल्यानंतर सिरसाट यांनी पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यावरून शेतकऱ्याने हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लाचलुचपतचे उपाधिक्षक विकास घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, जमादार गजानन पवार, राजाराम फुपाटे, विनोद पुंडगे, शेख अकबर महिला पोलिस कर्मचारी योगीता अवचार यांच्या पथकाने आज दुपारी आखाडा बाळापूर येथील तलाठी कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला होता. दरम्यान, ठरल्या प्रमाणे तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच घेताच ग्राम महसूल अधिकारी सिरसाट यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर त्यांच्या नांदेड येथील निवासस्थानी झडती घेण्याची कार्यवाही करण्याबाबत नांदेडच्या पथकाला कळविण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.
Source link
महिला ग्राम महसूल अधिकाऱ्यास 500 रुपयांची लाच घेताना अटक:विंधन विहीरीची सातबारावर नोंद घेण्यासाठी घेतली रक्कम, आखाडा बाळापूर येथील घटना