Headlines

कर्जमुक्ती योजनेत आधार प्रमाणीकरणाचा मार्ग सुकर:आपले सरकार केंद्र चालकाचा ठसा घेऊन तालुकास्तरीय समितीकडून होणार पडताळणी




पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण रखडलेल्या 3.18 लाख शेतकऱ्यांसाठी सहकार आयुक्त कार्यालयाने नवीन निर्णय घेतला असून आपले सरकार केंद्र चालकाच्या बोटाचा ठसा घेऊन शेतकऱ्याची तालुकास्तरीय समितीकडून पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. राज्यात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये 16.66 लाख पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. कर्जमुक्तीचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र बँक खात्याला आधारलिंक नसल्याने किंवा बोटाचा ठसा न जुळल्याने अनेक 3.18 लाख शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण रखडले आहे. या अडचणी लक्षात घेऊन सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे यांनी जिल्हा प्रशासनाला नवीन कार्यपद्धती राबवण्याचे निर्देश दिले आहेत. सध्याच्या स्थितीत 13.48 लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी आता आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून विशेष प्रक्रिया राबवली जाणार आहे. नवीन प्रक्रियेनुसार ज्या शेतकऱ्यांचे बोटाचे ठसे जुळत नाहीत त्यांनी यादीतील क्रमांक घेऊन आपले सरकार सेवा केंद्राला भेट द्यावी. तेथे आधारकार्ड आणि बँक पासबुक सोबत ठेवावे. केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून संबंधित शेतकऱ्यांच्या तीन वेळा वेगवेगळ्या बोटांनी आधार प्रमाणीकरणाचा प्रयत्न केला जाईल. त्यानंतरही प्रमाणीकरण होत नसेल तर केंद्र चालक “प्रमाणीकरण शक्य नाही” हा पर्याय निवडून स्वतःच्या बोटाने नोंद करेल आणि ही तक्रार तालुकास्तरीय समितीकडे पाठवली जाईल. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याने तहसील कार्यालयात जाऊन आधार कार्ड, बँक पासबुक आणि सातबारा सारखे पुरावे देऊन आपली ओळख निश्चित करावी लागेल. तालुकास्तरीय समिती पडताळणी करून आधार क्रमांक बरोबर असल्यास प्रमाणीकरण पूर्ण करतील. राज्यातील शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे अद्याप आधार प्रमाणीकरण झालेले नाही त्यांनी तातडीने आपले सरकार केंद्राशी संपर्क साधून ही प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *