Headlines

साहित्यिकांची सामाजिक बांधिलकी:बुक क्लब सदस्यांच्या पुढाकारातून दिवंगत डॉ. संपदा मुंडे यांच्या कौटुंबिक कर्जाची परतफेड




‘साहित्यिक हा समाजाचा आरसा असतो आणि त्याचे समाजाप्रती काही दायित्व असते’, हे केवळ बोलून न दाखवता कृतीतून सिद्ध करत प्रसिद्ध पानिपतकार विश्वास पाटील, साहित्यिक राजीव श्रीखंडे आणि त्यांच्या लेखक मित्रांनी समाजात एक नवा आदर्श घालून दिला आहे. काही महिन्यांपूर्वी फलटण येथे संशयास्पद मृत्यू झालेल्या दिवंगत डॉ. संपदा मुंडे यांच्या वडिलांनी मुलीच्या शिक्षणासाठी घेतलेल्या बँकेच्या संपूर्ण कर्जाची परतफेड या साहित्यिकांनी एकत्र येत केली आहे. राजकीय नेत्यांकडून फक्त भेटी, मदतीला धावले साहित्यिक काही महिन्यांपूर्वी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या घटनेवरून संपूर्ण राज्यात उलटसुलट चर्चा रंगल्या आणि राजकीय पक्षांनीही आरोप-प्रत्यारोपांची राळ उठवली. अनेक पक्षाच्या नेतेमंडळींनी मुंडे यांच्या कुटुंबाची भेट घेतली, मात्र कोणीही त्यांना ठोस आर्थिक मदत केली नाही. डॉ. मुंडे यांच्या वडिलांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून मुलीला शिकवले होते. तिच्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी स्टेट बँकेतून मोठे कर्ज घेतले होते. कमावती मुलगी गमावल्यानंतर या वृद्ध पित्यासमोर कर्जाचा डोंगर कसा फेडायचा, हा यक्षप्रश्न उभा राहिला होता. विश्वास पाटील आणि मित्रांचा पुढाकार बीड जिल्ह्यात एका दौऱ्यादरम्यान गेलेले प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांना या कुटुंबाच्या परिस्थितीची माहिती मिळाली. त्यांनी याविषयी सविस्तर माहिती घेऊन साहित्यिक राजीव श्रीखंडे व इतर लेखक मित्रांशी चर्चा केली. या सर्वांनी पुढाकार घेत आपल्या बुक क्लबच्या सदस्यांना आणि साहित्यिक मित्रांना मदतीचे आवाहन केले. सर्वांनीच या आवाहनाला उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद दिला. गुपचूप फेडले कर्ज, सोशल मीडियामुळे आले समोर सर्व साहित्यिकांनी एकत्र जमवलेल्या निधीतून 17 ऑगस्ट रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वडवणी शाखेत जाऊन मुंडे यांच्या कर्जाच्या संपूर्ण रकमेचा भरणा केला आणि कुटुंबाला कर्जमुक्त केले. विशेष म्हणजे, या संवेदनशील मदतीबाबत कोणत्याही साहित्यिकाने कुठेही वाच्यता केली नव्हती. मात्र, संभाजीनगर येथील रामराव गिट्टे यांनी सोशल मीडियावरून या घटनेची माहिती दिल्यानंतर, पानिपतकार विश्वास पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. केवळ शब्दांचे फुलोरे न पाडता संकटसमयी एका गरजू कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून या साहित्यिकांनी दाखवलेल्या सामाजिक भान आणि सहृदयतेचे सर्व स्तरांतून भरभरून कौतुक होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *