Headlines

सिंहगडावर पर्यटकांना मारहाण प्रकरण:8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; एका कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई




सिंहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी हवेली पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संकेत संजय पाटील याच्यासह सात जणांचा आरोपींमध्ये समावेश असून, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अवधूत पांडुरंग पाटील (वय ३९, रा. व्यंकटेश सेरेनिटी, डीएसके रोड, धायरी, पुणे) हे १६ ऑगस्ट रोजी पत्नी, आठ वर्षांची मुलगी तसेच मित्राच्या कुटुंबासह सिंहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले होते. दुपारी दोनच्या सुमारास ते किल्ल्यावरील एका स्मारकाजवळ छायाचित्र काढत होते. त्यावेळी मुलीचा पाय चुकून तेथे असलेल्या एका वस्तूवर पडल्याने संबंधित व्यक्तींनी आक्षेप घेतला. याच कारणावरून आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्यासोबत असलेल्या पर्यटकांशी वाद घातला. “हिंदू संस्कृती कळत नाही का?” असे म्हणत फिर्यादी, साक्षीदार आणि अन्य पर्यटकांना हाताने मारहाण करण्यात आली. तसेच प्लास्टिकच्या काठीचाही वापर करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर फिर्यादीने किल्ल्यावरील बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर हवेली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी संकेत संजय पाटील (मूळ रा. मंडळ कोळे, ता. पाटण, जि. सातारा) आणि अन्य सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना नोटीस देण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभमकुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *