Headlines

प्रवाशांच्या जिवाशी खेळ : नगर-मनमाड मार्गावर महिन्याभरातच पुलाला भगदाड:ठेकेदाराच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी




नगर-मनमाड महामार्गावरील राहुरी फॅक्टरी ते राहुरी दरम्यान असलेल्या एमआयडीसी परिसरातील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला महिनाभरातच मोठे भगदाड पडल्याची घटना समोर आली. या प्रकारामुळे महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित ठेकेदाराच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या महामार्गावर दिवस-रात्र मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. अवजड वाहतुकीचा भार सहन करण्यासाठी मजबूत दर्जाचे बांधकाम अपेक्षित असताना, पुलाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पुलाच्या स्लॅबमध्ये केवळ ६ एमएमच्या गजाचा (लोखंडी सळ्या) वापर करण्यात आल्याचे उघड झाले. या कामाची त्रयस्थ संस्थेकडून चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राहुरी तालुक्यात तीन आमदार आणि दोन खासदार असतानाही महामार्गाच्या कामावर पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, हे वृत्त समोर येताच संबंधित ठेकेदाराला अखेर जाग आली असून, पुलावरील भगदाड बुजवून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. मात्र, केवळ मलमपट्टी न करता दोषी ठेकेदारावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *