Headlines

प्रारूप मतदार यादीतून वगळलेल्यांना पुन्हा अर्जाची संधी:बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांचा शोध घेणार; गणना अर्ज पुन्हा सादर करता येणार




विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार मतदार म्हणून नोंद झाल्याने प्रारूप मतदार यादीत नाव न आलेल्यांना पुन्हा अर्ज करता येणार आहे. गणना अर्ज सादर करून त्यांना अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेता येईल. यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) मतदारांचा शोध घेऊन अर्ज पोहोचवण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. गणना अर्ज न मिळालेल्या मतदारांच्या मतदान केंद्रनिहाय याद्या पुन्हा प्रसिद्ध केल्या जातील. या याद्या मतदान केंद्रे, ग्रामपंचायत भवन, महापालिका आणि नगरपालिका कार्यालये, तसेच गटविकास अधिकारी आणि पंचायत अधिकारी कार्यालयांत लावल्या जातील. त्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावरही उपलब्ध असतील. प्रारूप यादीत नाव वगळण्याची संभाव्य कारणेही त्यात दिली जातील. मतदारांना सध्याच्या निवासस्थानाच्या कार्यक्षेत्रातील मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा बीएलओकडे अर्ज देता येईल. निवडणूक आयोगाच्या संगणकीय प्रणालीवर त्यांचे अंशतः भरलेले अर्ज उपलब्ध असतील. जुन्या मतदार ओळखपत्र क्रमांकाच्या आधारे आयोगाच्या संकेतस्थळावरून किंवा मोबाइल अॅपवरूनही अर्ज डाउनलोड करून भरता येईल. संगणकीय पद्धतीने स्वाक्षरी करून अर्ज सादर करण्याची सुविधाही असेल. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी बीएलओ राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत घरोघरी भेटी देतील. शेजारी, कुटुंबीय आणि रहिवासी संघटनांकडे चौकशी करून मतदारांचा शोध घेतला जाईल. संदेश, मोबाइल संदेश आणि ई-मेलद्वारेही अर्ज पाठवण्याचे निर्देश आहेत. राज्यातील दुसऱ्या विधानसभा मतदारसंघात स्थलांतरित झालेल्यांना नव्याने नमुना अर्ज क्रमांक 8 भरण्याची गरज नाही. त्यांनी नवीन पत्ता, गणना अर्ज, विहित विवरणपत्र आणि पत्त्याचा पुरावा द्यावा. बेघर व्यक्तीकडे पत्त्याचा दस्तऐवज नसल्यास बीएलओचा प्रत्यक्ष पडताळणी अहवाल ग्राह्य धरला जाईल. मिळालेल्या अर्जांची पात्रता आणि निवासस्थान तपासले जाईल. स्वीकारलेले अर्ज अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी स्वतंत्र ठेवले जातील. संबंधित मतदारांचा जुना मतदार ओळखपत्र क्रमांक कायम राहील. यापूर्वी नमुना अर्ज क्रमांक 6 भरलेल्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. पात्र मतदार नाव नोंदणीपासून वंचित राहू नयेत आणि दुबार नोंदणी होऊ नये, यासाठी विशेष देखरेख ठेवण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *