![]()
ज्येष्ठ भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांच्या भाषासंरक्षणाच्या भूमिकेला आधुनिक तंत्रज्ञानाचे पाठबळ मिळावे, असे मत महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (MKCL) प्रमुख सल्लागार डॉ. विवेक सावंत यांनी व्यक्त केले. प्रा. शेख यांच्या निधनानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात ही श्रद्धांजली सभा पार पडली. यावेळी प्रा. शेख यांच्या कन्या प्रा. रूमा बावीकर, डॉ. शमा भागवत आणि नात जुई यांच्यासह त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. डॉ. सावंत म्हणाले की, प्रा. यास्मिन शेख या मराठी भाषेच्या जागरूक संरक्षक होत्या. त्यांची भाषाशास्त्र, व्याकरण आणि शुद्धलेखन संरक्षणाची भूमिका नव्या काळात तंत्रज्ञानाने स्वीकारणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. एआय प्रभावित पिढीसाठी ही प्रेरणादायी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. शेखबाईंच्या व्यक्तिमत्त्वात असे काही होते की, त्या अमरत्व घेऊन आल्या आहेत असे वाटावे. त्यांचे ज्ञानवंत कार्य समाजाला जागरूक करते, शिक्षित करते आणि भाषाप्रेमाचे मूल्य रुजवते. त्यामुळे त्यांचा प्रभाव सदैव राहील. मराठी भाषेच्या त्या संरक्षक आणि भाषाप्रेमाचे मूर्तिमंत प्रतीक होत्या, असे डॉ. सावंत यांनी अधोरेखित केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विश्वस्त डॉ. माधवी वैद्य यांनीही प्रा. शेख यांना आदरांजली वाहिली. त्या म्हणाल्या, शेखबाईंनी मराठीवर श्रीमंत प्रेम केले. मराठीचा शब्दसंभार आस्थेने सांभाळणाऱ्या त्या भाषायोगिनी होत्या. परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी नांदी संमेलनाच्या निमित्ताने प्रा. शेख यांच्याशी झालेल्या भेटीचा उल्लेख केला. अतिशय शांत, समाधानी आणि संयमित असे परिपूर्ण व्यक्तिमत्त्व त्यांच्या रूपाने भेटले, असे सोमण यांनी सांगितले. प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक यांनी राज्यस्तरीय शुद्धलेखन समितीच्या बैठकांमधील प्रा. शेख यांच्या आठवणींना उजाळा दिला. आवेश किंवा कठोरपणा न आणताही आपले मत ठामपणे आणि संयमितपणाने मांडणे, ही शेखबाईंची विशेषता होती, असे महाळंक यांनी स्पष्ट केले. कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी, अभिजात परंपरेतील एक पर्व संपल्याची भावना व्यक्त केली. मराठी व्याकरण पोरके झाल्याचेही ते म्हणाले. प्रा. शेख यांच्या कन्या प्रा. रूमा बावीकर यांनी आपल्या आईच्या आठवणी सांगितल्या. आलेल्या प्रत्येक पत्राला स्वहस्ताक्षरात उत्तरे देणे हे आईला कर्तव्य वाटत असे. त्या अतिशय शिस्तप्रिय, शांत आणि समाधानी वृत्तीने जगल्या. शब्दकोडी सोडवणे त्यांना आवडत असे, असेही बावीकर यांनी नमूद केले.
Source link
प्रा. यास्मिन शेख यांच्या कार्याला तंत्रज्ञानाचे पाठबळ द्यावे: डॉ. सावंत:मराठी भाषा संरक्षणासाठी श्रद्धांजली सभेत मत व्यक्त