Headlines

अकोल्यात 5 कोटींच्या भूखंडाचा घोटाळा:ठाकरे गटाच्या युवा सेना जिल्हाप्रमुखासह तिघे पोलिसांच्या ताब्यात




अकोल्यातील मलकापूर परिसरात तब्बल 5 कोटी रुपये किमतीच्या भूखंडाची बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत तीन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या युवा सेनेचा अकोला जिल्हाप्रमुख आस्तिक श्रीकृष्ण चव्हाण याचा समावेश असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. मलकापूर भागातील सुमारे 5 हजार 75 चौरस फुटांचा मोक्याचा भूखंड 84 वर्षीय शांता बाहेकर यांच्या मालकीचा आहे. या भूखंडाशी संबंधित व्यवहारात गैरप्रकार झाल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. नेमकं काय आहे प्रकरण? पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी शांता बाहेकर यांच्या नावाने बनावट कुलमुखत्यारपत्र तयार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर या कागदपत्रांचा वापर करून भूखंडाच्या व्यवहारासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करण्यात आली. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष मालक असलेल्या 84 वर्षीय महिलेऐवजी दुसऱ्याच महिलेला शांता बाहेकर म्हणून उभे करण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या महिलेच्या माध्यमातून बनावट खरेदीखत तयार करून भूखंडाची विक्री करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. बाजारभावानुसार या भूखंडाची किंमत जवळपास 5 कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक या प्रकरणात पोलिसांनी आस्तिक श्रीकृष्ण चव्हाण, राहुल जाधव आणि प्रियंका पाटील ऊर्फ प्रियंका चव्हाण या तिघांना अटक केली आहे. आस्तिक चव्हाण हा उद्धव ठाकरे गटाच्या युवा सेनेचा अकोला जिल्हाप्रमुख असल्याची माहिती आहे. तर प्रियंका पाटील ही आस्तिक चव्हाण यांची वहिनी असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, तिघांनी संगनमत करून हा व्यवहार केल्याचा आरोप आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात नेमकी कोणाची काय भूमिका होती, याचा तपास अद्याप सुरू आहे. दोन तासांत कारवाई, पोलिसांकडून तपास सुरू तक्रार दाखल झाल्यानंतर अकोला स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपींचा माग काढला. त्यानंतर अवघ्या दोन तासांत तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिन्ही आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात बनावट कुलमुखत्यारपत्र आणि खरेदीखत नेमके कुठे तयार करण्यात आले, ते तयार करण्यासाठी कोणाची मदत घेण्यात आली आणि या संपूर्ण व्यवहारामागे आणखी कोण व्यक्ती आहेत, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. तसेच, या प्रकरणात सरकारी यंत्रणेतील कोणाचा सहभाग होता का, बनावट कागदपत्रे तयार करताना कोणत्या व्यक्ती किंवा संस्थेची मदत घेण्यात आली का, याचीही माहिती पोलिसांकडून गोळा केली जात आहे. त्यामुळे तपास पुढे गेल्यानंतर या प्रकरणात आणखी काही नावे समोर येतात का, याकडे लक्ष लागले आहे. हेही वाचा.. नाशिकमधील कुंभमेळ्यात 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार होणार:संजय राऊतांचा गंभीर आरोप, म्हणाले- मुख्यमंत्र्यांना खोटं बोलण्याची डिग्री द्यावी लागेल नाशिकमधील कुंभमेळ्याच्या तयारीसह शहरातील रस्त्यांची अवस्था आणि कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला आणि मेळाव्याला नागरिकांनी बहिष्कार टाकल्याचा दावा करत, “९९ टक्के खुर्च्या रिकाम्या होत्या,” असा आरोप राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *