![]()
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून अंतरवाली सराटी येथे आपले निर्णायक उपोषण सुरू केले आहे. हा आपला आरपारचा आणि शेवटचा लढा असून आपण विजयाच्या अगदी जवळ आहोत, त्यामुळे मराठा बांधवांनी आता गाफील न राहता घराबाहेर पडावे, असे भावनिक आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. अजितदादांचा अनवधानाने उल्लेख उपोषणाला बसण्यापूर्वी सरकारला इशारा देताना जरांगे पाटील यांच्याकडून एक भावनिक चूक घडली. “सरकारशी मी आज गोडीने बोलतोय, उद्या वातावरण बिघडू शकते. मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब तुम्ही समजून घ्या… आणि अजितदादा तुम्ही देखील समजून घ्या,” असे जरांगे म्हणाले. मात्र, दिवंगत अजित पवार आपल्यात नाहीत, हे लक्षात येताच त्यांनी लगेच स्पष्टीकरण दिले. “अजितदादा आपल्यातून निघून गेले आहेत असे वाटतच नाही. ते सतत आपल्यात असल्यासारखे वाटते, त्यामुळेच अनवधानाने त्यांचे नाव माझ्या तोंडी आले,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली. ‘उद्यापासून बोलता येणार नाही’ आपल्या प्रकृतीबाबत आणि आंदोलनाच्या तीव्रतेबाबत बोलताना जरांगे पाटील यांनी समाजाला जागे होण्याचे आवाहन केले. “मी गेल्या तीन वर्षांपासून समाजासाठी प्रामाणिक लढा देत आहे. आता मला वेळ देता येणार नाही आणि उद्यापासून कदाचित मला बोलताही येणार नाही. त्यामुळे आजच मी माझे म्हणणे मांडत आहे. आता जर आपण रस्त्यावर उतरलो नाही, तर आपल्या पुढच्या पिढ्यांचे मोठे नुकसान होईल,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली. सरकारकडे प्रमुख मागण्या या उपोषणाच्या माध्यमातून जरांगे पाटील यांनी सरकारच्या ५८ लाख कुणबी नोंदींच्या आधारे तात्काळ प्रमाणपत्रे देण्याची मागणी लावून धरली आहे. तसेच, मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे सरसकट मागे घ्यावेत, आरक्षणाच्या लढ्यात बलिदान दिलेल्या बांधवांच्या कुटुंबांना आर्थिक मदत व नोकरी द्यावी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून व्याज परतावा तातडीने मिळावा, अशा प्रमुख मागण्या त्यांनी सरकारसमोर ठेवल्या आहेत. संबंधित बातमी वाचा.. मनोज जरांगे पाटलांचे 11वे आमरण उपोषण सुरू: म्हणाले- सरकारच्या नियतीत खोट, मराठ्यांचे कल्याण होऊ द्यायचे नाही; इथं तोडगा निघाला नाही तर मुंबई गाठणार! मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून (शनिवार) आंतरवाली सराटी येथे आपले 11वे आमरण उपोषण सुरू केले आहे. “जीवघेणा लढा आता सुरू झाला आहे, अंमलबजावणी झाल्याशिवाय आता माघार घेणार नाही. सरकारने लवकर निर्णय घेतला नाही तर मुंबईला जाणार,” असा थेट इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकार, जात पडताळणी समिती आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर जोरदार ताशेरे ओढले. सविस्तर वाचा
Source link
'अजितदादा गेल्यासारखे वाटतच नाहीत…':सरकारला इशारा देताना जरांगेंकडून अनवधानाने उल्लेख, लक्षात येताच दिले भावनिक स्पष्टीकरण