Headlines

ऑर्गन-तबल्याची सुरेल साथ अन् हाऊसफुल्ल प्रेक्षागृह:अहिल्यानगरमध्ये संगीत नाटकांचा देदीप्यमान ‘नाट्यजागर’!




तिसरी घंटा झाली, पडदा उघडला, ऑर्गनचे सूर आणि तबल्याची थाप दुमदुमली… अन् माऊली सभागृहात जमलेला प्रत्येक रसिक एका मोहमयी संगीत नाटकांच्या दुनियेत हरवून गेला! ज्या भूमीने महाकरंडक सारख्या स्पर्धांमधून कलावंत घडवले, त्याच अहिल्यानगरच्या सांस्कृतिक इतिहासात महाराष्ट्र शासनाच्या तीन दिवसीय संगीतनाट्य महोत्सवाने सुवर्णपान लिहिले आहे. माझी आदरणीय गुरुवर्य पद्मश्री जयमालाबाई शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षात घडलेला हा सोहळा माझ्यासाठी अत्यंत भावुक आणि आनंददायी ठरला. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या कल्पनेतून आणि सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे, सांगली नंतर अहिल्यानगरला लाभलेला हा मान मराठी रंगभूमीचे संवर्धन करणारा ठरला. २५ ते २७ ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या या महोत्सवात तीन अजरामर कलाकृतींनी रसिकांना भारावून टाकले. पहिल्या दिवशी माझ्या श्रुती संगीत निकेतनच्या कलाकारांनी सादर केलेल्या, गुरुवर्य डॉ. विकास कशाळकर लिखित ‘संगीत ऊस डोंगा परी’ या नव्या नाटकाने सामाजिक समतेचा संदेश देत भक्तीरसात चिंब केले. ललत पंचम, संपूर्ण मालकंस, सरस्वती, अभोगी, मधमाद सारंग अशा शास्त्रीय रागांवर आधारित पदांना रसिकांनी ‘वन्समोअर’ची भरभरून दाद दिली.तसेच तिन्ही दिवस रसिकांची अलोट गर्दी आणि वन्समोअरची दाद कलाकारांना प्रोत्साहित करणारी होती. दुसऱ्या दिवशी पुण्यातील बालगंधर्व रसिक मंडळाच्या ‘संगीत कान्होपात्रा’ने प्रेक्षकांचे डोळे पाणावले, तर अखेरच्या दिवशी रत्नागिरीच्या खलवायन संस्थेच्या ‘संगीत संशयकल्लोळ’ या विनोदी नाटकाने हास्याचे कारंजे फुलवले. ऑर्गन, पखवाज, व्हायोलिनची जोड, पारंपरिक वेशभूषा आणि ‘जोहार मायबाप’, ‘मृगनयना रसिक मोहिनी’ यांसारख्या पदांनी थेट काळजाचा ठाव घेतला. मोबाईल आणि ओटीटीच्या युगातही तरुण पिढीने हाऊसफुल्ल गर्दी करत थेट गायन-अभिनयाचा हा संगम अनुभवला, हेच या सोहळ्याचे खरे यश आहे. या महोत्सवाने नगरच्या सांस्कृतिक चळवळीला नवी ऊर्जा दिली आहे. शासनाचे आभार मानताना सांगावेसे वाटते.. महाराष्ट्र शासनाचा हा उत्सव, कलेला बळ, कलाकारांना गौरव, अहिल्यानगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा, संगीत नाटकांचा असाच अखंड वाहो झरा शब्दांकन : महेश पटारे. अहिल्यानगरमधील माऊली सभागृहात राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित तीन दिवसीय संगीत नाट्य महोत्सवाचा प्रारंभ अतिशय दिमाखात झाला. तीन वेगवेगळ्या शैलींतील व विविध प्रदेशांतील नाटकांचा संगम हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरत आहे. ‘दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी प्रसिद्ध संगीत नाट्य दिग्दर्शिका डॉ. धनश्री मकरंद खरवंडीकर यांनी या सोहळ्याचे केलेले हे खास समीक्षात्मक वार्तांकन…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *