![]()
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक आज मुंबईत पार पडली. मात्र, या बैठकीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते आमदार रोहित पवार यांच्या गैरहजेरीने. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसशी वाढलेली जवळीक आणि पक्षाच्या काही धोरणांपासून राखलेले अंतर यामुळे रोहित पवार यांच्या भूमिकेबाबत अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत कोअर कमिटीच्या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या आणि एनडीएत सामील होण्याच्या चर्चांना पूर्णपणे फेटाळून लावले. रोहित पवारांच्या गैरहजेरीमुळे चर्चांना उधाण रोहित पवार हे सध्या राज्यभर दौरे आणि आंदोलनांच्या माध्यमातून सक्रिय आहेत. मात्र, शनिवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या महत्त्वाच्या बैठकीला त्यांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जात आहेत. अलीकडच्या काळात रोहित पवार यांची काँग्रेस पक्षाशी जवळीक वाढल्याचे दिसून येत आहे. रोहित पवार यांचा भाजपशी हातमिळवणी करून ‘एनडीए’त (NDA) सामील होण्यास ठाम विरोध असल्याचे मानले जाते. पक्षातील या धोरणात्मक मतभेदांमुळेच त्यांनी आजच्या बैठकीला गैरहजेरी लावली असावी, अशी चर्चा आहे. मात्र, रोहित पवार यांनी या गैरहजेरीबाबत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना पूर्वकल्पना दिल्याचे समजते. या बैठकीला जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे, अशोक पवार, राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख आणि खासदार निलेश लंके आदी प्रमुख नेते उपस्थित होते. विलिनीकरणाची कोणतीही चर्चा नाही, लक्ष फक्त पक्षवाढीवर: शशिकांत शिंदे पत्रकारांशी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाची पुढील दिशा स्पष्ट केली. “आजच्या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही किंवा आमच्याकडे तसा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आमचे संपूर्ण लक्ष पक्ष संघटना मजबूत करण्यावर आहे. ऑक्टोबर महिन्यापासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे सुरू करणार आहोत.” “येत्या काळात पक्ष संघटनेत राज्य स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत बदल केले जातील आणि विशेषतः युवा वर्गाला मोठी संधी देण्यावर आमचा भर राहील.” मनोज जरांगे आणि मराठा आरक्षण “58 लाख कुणबी नोंदी सापडूनही जरांगे यांना पुन्हा उपोषणाला का बसावे लागले? राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने आणि दिलेले दाखले रद्द झाल्याने ही वेळ आली आहे. सरकारने स्पष्ट भूमिका मांडणे गरजेचे आहे.” आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बोलताना ते म्हणाले की, “आदिवासी विद्यार्थ्यांचे १६ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. त्यांना मिळणारा भत्ता अपुरा आहे, पण मंत्री या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाहीत. मुख्यमंत्री आज त्यांची भेट घेणार आहेत, त्यातून मार्ग निघावा ही अपेक्षा आहे.” कुंभमेळ्यातील बोगस भरती रॅकेट “नाशिकच्या कुंभमेळ्याच्या नावाखाली एक मोठे ‘बोगस भरती रॅकेट’ समोर आले आहे. बेरोजगारांना गंडवण्याचा आणि भ्रष्टाचाराचा हा प्रकार असून यात काही मंत्र्यांच्या नातेवाईकांचेही नाव समोर येत आहे. जोपर्यंत अशा पेपरफुटी आणि भरती रॅकेटचा पर्दाफाश होत नाही, तोपर्यंत खऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही.” पनवेलमधील बोगस मतदार यादीचा संशय “पनवेलमध्ये एका झेरॉक्स सेंटरमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्याकडे गोपनीय कागदपत्रांच्या (SIR) हजारो प्रती सापडल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांची मते कमी करून बोगस मतदार वाढवण्याचे मोठे षडयंत्र यात असू शकते. निवडणूक आयोगाने यावर तातडीने कारवाई करावी, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू.” रिक्षाचालकांना मुदतवाढ आणि महायुतीतील वाद “मराठी सक्तीबाबत परिवहन खात्याने (शिवसेना) घेतलेल्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी (देवेंद्र फडणवीस) एका वर्षाची मुदतवाढ देऊन केराची टोपली दाखवली. ‘मीच सुपर बॉस’ असल्याचे फडणवीसांनी दाखवून दिले असून, उत्तर प्रदेश किंवा दिल्लीच्या दबावाखाली हा निर्णय घेण्यात आला असावा. यामुळे सरकारमधील सत्तासंघर्ष चव्हाट्यावर आला आहे.” हेही वाचा… आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न चिघळला: उईके-विद्यार्थ्यांमधील चर्चा निष्फळ, आज फडणवीसांसोबत बैठक राज्यातील आश्रमशाळा, वसतिगृहे, शिष्यवृत्ती आणि नोकरभरतीसह विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत आहे. नाशिक, पुणे, नागपूर, अमरावतीसह राज्यातील विविध भागांत विद्यार्थी आंदोलन करत असून, सरकारकडून चर्चा करूनही अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर आदिवासी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. त्यामुळे या बैठकीत आंदोलनावर तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीला रोहित पवारांची दांडी:शशिकांत शिंदेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका; म्हणाले- विलिनीकरणाची कोणतीही चर्चा नाही, लक्ष फक्त पक्षवाढीवर