![]()
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गणेश मंडळांना डीजे आणि लेझर बीमचा वापर टाळून आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. पुणेकरांना उद्देशून काढलेल्या एका पत्रकात त्यांनी, गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव असल्याचे म्हटले आहे. पाटील यांनी नमूद केले की, डीजे आणि लेझर बीमच्या अतिवापरामुळे ज्येष्ठ नागरिक, रक्तदाबाचे रुग्ण, लहान मुले तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या वापराला भक्तिभावाने काम करणारा कोणताही संवेदनशील गणेश मंडळाचा कार्यकर्ता पाठिंबा देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकमान्य टिळकांनी समाजप्रबोधन, लोकहित आणि राष्ट्रहिताच्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप दिले. पूर्वी उत्सवात काही अनुचित प्रथा शिरल्या होत्या, त्या दूर करून ढोल-ताशा पथके आणि सामुदायिक अथर्वशीर्ष पठणासारख्या चांगल्या प्रथा रुजवण्यात गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्याची आठवणही पाटील यांनी करून दिली. “डीजे हवाच” असा आग्रह धरणारे मोजके लोक आहेत. गणेशोत्सव म्हणजे डीजे, अशी भ्रामक कल्पना गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या मनात नाही. गणेश मंडळाचा कार्यकर्ता हा समाजाचाच घटक असल्याने डीजे आणि लेझरमुळे होणारा त्रास त्यालाही चांगल्या प्रकारे समजतो, असे पाटील यांनी स्पष्ट केले. कोरोना काळात गणेश मंडळांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचीही त्यांनी आठवण करून दिली. त्यावेळी मंडळांनी सरकारने घातलेले निर्बंध स्वीकारले आणि पुण्याची ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणूकही समाजहितासाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे आता निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड होणार नाही, याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असे ते म्हणाले. कायद्याने घातलेल्या बंधनांचा सन्मान करणे गरजेचे असून, गणेशोत्सवाची आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली सकारात्मक प्रतिमा कायम राखण्यासाठी नकारात्मक बातम्या जगभर जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. उत्सवातील उत्साहाला बांध नसावा; मात्र त्याचा नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले. “पुणेकरांच्या हृदयात भक्तिभाव जागला पाहिजे, छातीत धडकी भरता कामा नये. भक्ती, सामाजिक जाणीव आणि कायद्याचा सन्मान राखून गणरायाचा उत्सव उदंड उत्साहाने साजरा करूया,” असे आवाहन पाटील यांनी शेवटी केले.
Source link
डीजे, लेझर टाळून आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा:मंत्री चंद्रकांत पाटील यांचे गणेश मंडळांना आवाहन