Headlines

सुरक्षा बंध:एक हजारांवर शालेय विद्यार्थ्यांनी केला बालविवाह रोखण्याचा निर्धार




रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून पारनेर येथील अ.ए. सोसायटीच्या सेनापती बापट विद्यालयात स्नेहालय संचलित ‘उडान’ प्रकल्पाच्या वतीने ‘सुरक्षा बंध’ अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे १ हजार विद्यार्थ्यांनी बालविवाह रोखण्याचा आणि बहिणीच्या शिक्षणाला पूर्ण सहकार्य करण्याचा सामाजिक निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रवीण कदम म्हणाले, बहिणीचे खरे संरक्षण म्हणजे केवळ संकटात पाठीशी उभे राहणे नसून तिचे शिक्षण पूर्ण करणे, तिचा बालविवाह थांबवणे आणि तिच्या स्वप्नांचा आदर करणे होय. बालविवाहामुळे मुलींचे शिक्षण अर्धवट राहून आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे बालविवाह रोखणे ही समाजातील प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. याप्रसंगी मुख्याध्यापक रावसाहेब कासार, विकास सुतार, आर.जे. ऋतुजा, नेहा धिवरे आणि भगवान गायकवाड आदी उपस्थित होते. स्नेहालयच्या उडान प्रकल्पांतर्गत संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा बालविवाहमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राखी बांधली हातावर; बालविवाह रोखण्याची जबाबदारी घेतली मनावर! या घोषवाक्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी घेतली बालविवाह रोखण्याची शपथ मी स्वतः बालविवाह करणार नाही आणि माझ्या बहिणीचाही बालविवाह होऊ देणार नाही. मी १८ वर्षांखालील मुलीशी विवाह करणार नाही. माझ्या आजूबाजूला बालविवाह होत असल्याचे आढळल्यास त्याला ठाम विरोध करीन, अशी शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. १६३ बालविवाह रोखले जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी सामाजिक संस्था आणि पोलीस प्रशासन प्रभावी उपाययोजना राबवत आहेत. स्नेहालयच्या उडान प्रकल्पाच्या माध्यमातून कौटुंबिक दबाव आणि आर्थिक परिस्थितीमुळे होणाऱ्या बालविवाहांबाबत जनजागृती केली जात आहे. चाइल्डलाइन आणि स्थानिक प्रशासनाच्या सक्रिय समन्वयामुळे वर्षभरात जिल्ह्यात १६३ बालविवाह यशस्वीरीत्या रोखले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *