Headlines

आदिवासी विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घ्यावे:बोगस प्रवेशाबाबत लेखी स्पष्टता मिळाल्यास आंदोलन थांबवा- कपिल पाटील




समाजवादी नेते आणि माजी विधान परिषद सदस्य कपिल पाटील यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना १६ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये बिगर-आदिवासींची घुसखोरी आणि बोगस आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेशापासून रोखण्यासाठी शासनाकडून लेखी आणि सुस्पष्ट आश्वासन मिळताच हे उपोषण थांबवावे, अशी त्यांची मागणी आहे. पाटील यांनी शासनाकडे स्पष्ट आणि प्रभावी प्रतिबंधात्मक व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये बिगर-आदिवासींना प्रवेश मिळणार नाही आणि बोगस आदिवासी प्रमाणपत्रांच्या आधारे कोणीही प्रवेश घेणार नाही, यासाठी ठोस यंत्रणा उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. ही प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे लाभ घेणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याबाबतही शासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी, असे पाटील यांनी नमूद केले. हा विषय तांत्रिक आणि किचकट असला तरी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असल्याने त्यात कोणतीही संदिग्धता नसावी, असे त्यांचे मत आहे. या प्रश्नावर खुद्द आदिवासी विकास मंत्र्यांनी दोन दिवसांची मुदत मागितली आहे. शासनाने हा विषय तातडीने मार्गी लावावा, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. मात्र, शासनाकडून लेखी स्पष्टता मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन अधिक न ताणता उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन त्यांनी पुन्हा केले. “उपोषणाला १६ दिवस झाले आहेत. आंदोलन अधिक काळ चालल्यास विद्यार्थ्यांना गंभीर शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते,” असे पाटील म्हणाले. आंदोलन वेगळ्या वळणावर जाऊ नये आणि हितसंबंधी घटकांनी विद्यार्थ्यांचा गैरवापर करू नये, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. शासनाकडून पुढील मागण्या मान्य करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली ताकद राखून ठेवावी, असे सांगत त्यांनी सर्व राजकीय पक्षांना आवाहन केले. भूतकाळातील चुका मान्य करून आरोप-प्रत्यारोपांचा खेळ थांबवून विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री आश्वासन पाळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “हीच शक्ती जपून पुढील लढाई जिंकायची आहे; अजून बरेच काही मिळवायचे आहे. त्यामुळे तूर्तास उपोषण थांबविण्याची गरज आहे,” असे पाटील यांनी शेवटी म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *