Headlines

बनावट कागदपत्रांद्वारे शासनाची फसवणूक:कोळसा येथील इंग्रजी शाळेकडून 5.08 कोटींच्या वसुलीचे आदेश




सेनगाव तालु्क्यातील कोळसा येथे विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ‘कै. लखन सर्जेराव नाईक इंग्लिश स्कूल’ची ‘राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण’ योजनेअंतर्गत झालेली निवड रद्द करण्याचा निर्णय शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने घेतला आहे. या शाळेने बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची दिशाभूल करून कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने हि कारवाई करण्यात आली आहे. शाळेकडून ५.०८ कोटी रुपयांचे अनुदान वसुल करण्याचे आदेश सोमवारी ता. १५ देण्यात आले ओहत. सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लखन सर्जेराव नाईक इंग्रजी शाळेने इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवाडी शिक्षण योजने अंतर्गत निवड करतांना बनावट कागदपत्रे तयार केली होती. त्यामुळे या शाळेची चौकशी करण्याची मागणी आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी विधानसभेत केली होती. त्यानुसार या शाळेच्या चौकशीसाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या संचालिका सोनाली मुळे यांनी समिती स्थापन केली होती. या समितीला तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार समितीने हिंगोली व शाळेवर जाऊन चौकशी केली. यामध्ये शाळेने सन २०२१-२२ मध्ये या योजनेसाठी प्रस्ताव सादर करताना शिक्षण उपसंचालक (छत्रपती संभाजीनगर) आणि शिक्षणाधिकारी (हिंगोली) यांची बनावट स्वाक्षरी असलेली कागदपत्रे तयार केली होती. इतकेच नव्हे तर, इयत्ता १० वीच्या किमान ३ बॅच उत्तीर्ण झाल्याचे भासवण्यासाठी इतर शाळांच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून ती स्वतःची असल्याचे दाखवले होते. या खोट्या कागदपत्रांच्या आधारे संस्थेने सन २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीत ५.०८ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त करून घेतल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. या गंभीर गैरप्रकाराची दखल घेत शासनाने शाळेची इंग्रजी माध्यमाच्या योजनेत झालेली निवड रद्द करण्यात आली आहे. तसेच संस्थेला देण्यात आलेल्या ५ कोटी ८ लाख रुपयांच्या निधीची तात्काळ वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. विहित मुदतीत ही वसुली झाली नाही, तर संबंधित संस्थेविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तत्कालीन अधिकारी कारवाईच्या रडारवर या प्रकरणात कागदपत्रांची पडताळणी न करता हलगर्जीपणा करणाऱ्या तत्कालीन सहाय्यक आयुक्त किंवा सहाय्यक संचालकांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आता त्याकालावधीत असलेले दोन अधिकारी कारवाईच्या रडारवर आले आहेत. शाळेची या योजनेसाठी निवड रद्द झाल्याने इंग्रजी निवड रद्द झाल्यामुळे तेथे निवासी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी, त्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *