Headlines

IAS तुकाराम मुंढेंचा धसका!:'साहेब येणार'च्या नुसत्या अफवेनेच राज्यातील बाजारपेठांना कुलूप, गुटखा माफियांचे धाबे दणाणले




राज्यातील कडक शिस्तीचे आणि धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच धडक कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यांच्या या कठोर कार्यपद्धतीचा राज्यभर एवढा धसका घेण्यात आला आहे की, केवळ ते तपासणीसाठी येणार असल्याच्या अफवेनेच मोठ्या बाजारपेठा काही मिनिटांत कुलूपबंद होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. याचेच एक ताजे उदाहरण बुलढाणा जिल्ह्यात पाहायला मिळाले. मेहकर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या डोणगाव येथे सोशल मीडियावर ‘एफडीएचे साहेब तपासणीसाठी येणार’ असा एक मेसेज वाऱ्यासारखा पसरला. या केवळ एका मेसेजमुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आणि काही मिनिटांतच संपूर्ण बाजारपेठ बंद झाली. कारवाईच्या भीतीने किराणा व मिठाईच्या दुकानांसह पानटपऱ्या आणि हॉटेल चालकांनीही आपली दुकाने तातडीने बंद करून तेथून पळ काढला. तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार अन्न आणि औषध प्रशासनाने आपला मोर्चा आता ग्रामीण भागाकडेही वळवला आहे. या धडक कारवाईचा धसका घेत अनेक छोटे-मोठे व्यावसायिक, हॉटेल चालक, तसेच किराणा आणि मिठाईच्या दुकानदारांनीही आपली दुकाने बंद करून पळ काढण्यातच धन्यता मानली. विशेषतः भेसळ करणारे आणि अवैध मार्गाने व्यवसाय करणारे व्यापारी आता चांगलेच धास्तावले असून, साहेबांच्या कारवाईच्या भीतीने त्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवण्यास पसंती दिली आहे. परळीमध्ये पानटपरी चालकांनी टपऱ्यांना लावले कुलूप अवैध गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री करणाऱ्या पानटपरी चालकांमध्ये तर आयुक्त मुंढे यांच्या पथकाची मोठी दहशत निर्माण झाली आहे. रविवारी परळीमध्ये एफडीएचे पथक कारवाई करणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण बीड जिल्ह्यात पसरली. या बातमीनंतर संभाव्य कारवाईचा बडगा आपल्यावरही उगारला जाईल, या भीतीने बीडमधील बहुतांश पानटपरी चालकांनी कारवाई होण्यापूर्वीच आपल्या टपऱ्यांना कुलूप ठोकले आणि तिथून काढता पाय घेतला. मोक्का अंतर्गत कारवाईच्या आदेशाने माफियांचे धाबे दणाणले राज्यात अवैध गुटखा आणि पानमसाला विक्रीला आळा घालण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक ऐतिहासिक आणि अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. यापुढे गुटख्याचे बेकायदा उत्पादन करणाऱ्या मोठ्या माफियांपासून ते अगदी किरकोळ विक्री करणाऱ्या पानटपरी चालकांपर्यंत सर्वांवर थेट ‘मोक्का’ अंतर्गत धडक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. मुंढे यांच्या या अभूतपूर्व निर्णयामुळे राज्यात सर्रासपणे चालणाऱ्या अवैध गुटखा व्यवसायाला मोठा हादरा बसला असून, या कडक पावलामुळे गुटखा माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. औषध विक्रीच्या नावाखाली रुग्णांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तांनी सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयानुसार, आता कोणत्याही रुग्णालयाला रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांवर रुग्णालयाच्या अंतर्गत असलेल्या फार्मसीमधूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही. यासंदर्भातील अधिकृत आदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आले असून, या नियमांचे उल्लंघन करून रुग्णांची पिळवणूक करणाऱ्या रुग्णालयांवर थेट त्यांचा परवाना रद्द करण्याची कठोर कारवाई केली जाणार असल्याचा सक्त इशारा देण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *