![]()
बारामती विधानसभा पोटनिवणुकीत अपक्ष म्हणून मैदानात असणाऱ्या करुणा मुंडे यांना भाजपची अप्रत्यक्ष फुस असल्याचा अंगुलिनिर्देश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. बारामतीत करुणा मुंडे यांना रोखणे भाजपच्या हातात होते. पण त्यांनी तसे प्रयत्नच केले नाही, असे ते म्हणालेत. अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभेसाठी येत्या 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवरून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवले आहे. सद्भावना म्हणून राज्यातील एकाही पक्षाने त्यांच्याविरोधात आपला उमेदवार दिला नाही. काँग्रेसने आपला उमेदवार दिला, पण तो मागे घेतला. यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल असे चित्र होते. पण त्यानंतरही 23 अपक्ष उमेदवारांनी ही निवडणूक लढण्याचा ठाम निर्धार केला. त्यामुळे सुनेत्रा पवारांना बारामतीत या सर्वांच्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. काय म्हणाले रोहित पवार? आमदार रोहित पवार यांनी आज सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सुरुवात केली. ते मतदारसंघात ठिकठिकाणी घोंगडी बैठका घेऊन मतदारांना आपल्या काकी सुनेत्रा पवारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. त्यातील एकेठिकाणी बोलताना रोहित यांनी अपक्ष उमेदवार करुणा मुंडे शर्मा यांच्या उमेदवारीचा संबंध भाजपशी जोडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, बारामती पोटनिवडणुकीत सध्या 23 अपक्ष उमेदवारांचे अर्ज राहिलेत. हे अर्ज राहायला नको होते. अजित पवार यांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करून जो उमेदवारांचा आकडा 60 होतो, तो 23 वर आणला. पण अपक्ष उमेदवारांची नावे पाहिली, तर त्यात करुणा मुंडे यांचे एक नाव आहे. त्यांना भाजपच्या एखाद्या मोठ्या नेत्याने सांगितले असते, तर त्यांनी आपला अर्ज ठेवला नसता. त्यांनी तो मागे घेतला असता. याच्या मागचे कारण असे की, महाविकास आघाडीचे सरकार गेले, त्यावेळी आम्ही सर्व आमदारांनी सह्या करून अजित पवार यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली. त्यावेळी त्यांच्या नेतृत्वात धनंजय मुंडे भाजपवर जोरदार टीका करत होते. ज्या अधिवेशनात धनंजय मुंडे भाजपविरोधात बोलत होते, त्याच अधिवेशनात भाजपच्या एका मोठ्या नेत्याने करुणा मुंडे यांना आमंत्रित करून एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत करुणा मुंडे बोलल्या आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीका करणे सोडून दिले. त्यामुळे मला वाटते की, भाजपच्या एखाद्या नेत्याने करुणा मुंडे यांना सांगितले असते तर त्यांनी निश्चितपणे आपली उमेदवारी मागे घेतली असती. पण तरीही लोक हुशार आहेत. ज्यांनी लोकांनी बाहेरून येऊन या ठिकाणी उमेदवारी दाखल केली, त्यांना एकही मतदान पडणार नाही. तसेच जे बारामतीमधील उमेदवार आहेत, त्यांना स्वतःचे मतदान सोडले, तर त्यांच्या कुटुंबातीलही मतदान पडणार नाही, असे रोहित पवार अप्रत्यक्षपणे करुणा मुंडे यांना भाजपची फुस असल्याचा आरोप करताना म्हणाले.
Source link
बारामतीत करुणा मुंडेंना भाजपची फुस?:आमदार रोहित पवारांचा आरोप; उमेदवारी अर्ज मागे न घेण्यामागील कारण सांगितले समजावून