![]()
पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली रणनीती अधिक आक्रमक केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सत्तेला आव्हान देण्यासाठी मिशन बंगाल, राबवले जात असून, त्यात आता महाराष्ट्र भाजपही सक्रिय झाले आहे. या मोहिमेचा भाग म्हणून मुंबईहून पश्चिम बंगालकडे विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 17 एप्रिल रोजी ही विशेष रेल्वे सुटणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि इतर शहरांमध्ये मोठ्या संख्येने पश्चिम बंगालमधील कामगार वास्तव्यास आहेत. यापैकी अनेक जण असंघटित क्षेत्रात काम करतात. त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्या राज्यात जाता यावे, यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या रेल्वेमार्फत सुमारे 7 हजार मतदारांना पश्चिम बंगालमध्ये पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भाजपकडून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा हा वेगळा प्रयत्न मानला जात आहे. राज्यातील अनेक वरिष्ठ नेते, तसेच मुख्यमंत्रीही बंगालमध्ये प्रचारासाठी जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. पश्चिम बंगालमध्ये मतदान दोन टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्पा 23 एप्रिल रोजी, तर दुसरा टप्पा 29 एप्रिल रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीचे निकाल 4 मे 2026 रोजी जाहीर होणार आहेत. त्यामुळे देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले असून, सर्वच पक्षांनी आपापली ताकद पणाला लावली आहे. दरम्यान, भाजपने बंगालसाठी विविध घोषणा केल्या आहेत. गर्भवती महिलांसाठी विशेष आरोग्य सुविधा देण्याचा निर्णय, समान नागरी संहिता लागू करण्याचा प्रयत्न, घुसखोरी आणि गायींच्या तस्करीवर आळा घालण्याचे आश्वासन, तसेच बेरोजगार तरुणांना दरमहा तीन हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय, कायदा-सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. निवडणुकीत किती परिणाम होतो, याकडे लक्ष शेतकऱ्यांसाठीही विविध योजना जाहीर करण्यात आल्या असून, धान्य, बटाटे आणि आंबा यांसारख्या पिकांना योग्य भाव मिळावा यासाठी उपाययोजना करण्याचा दावा करण्यात आला आहे. धान खरेदीसाठी प्रति क्विंटल 3100 रुपयांचा दर देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. या सर्व घोषणांमुळे ‘मिशन बंगाल’ अधिक आक्रमक झाले असून, येणाऱ्या निवडणुकीत याचा किती परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Source link
महाराष्ट्र भाजपचे मिशन बंगाल सुरू:मुंबईहून पश्चिम बंगालकडे विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय; 7 हजार मतदारांना पोहोचवण्याचे नियोजन