![]()
सध्या देशात तसेच महाराष्ट्रात देखील नीट पेपर प्रकरणावरून तसेच दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. यावरून विरोधकांनी देखील केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर विद्यार्थी आंदोलक ठाम आहेत. इकडे मुंबईत देखील ठाकरे बंधू मोर्चा काढणार आहेत. या सगळ्या परिस्थितीवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, संजय राऊत यांना देशात कसा विध्वंस होईल, कशी अराजकता माजेल हेच त्यांना बघायचे असते. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडले आहे, तो त्यांचा निर्णय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री व्हिडिओद्वारे बोलण्यापेक्षा संसदेत बोलायला पाहिजे होते, असे संजय राऊत म्हणाले होते. त्यावर महाजन म्हणाले, तो आमचा निर्णय आहे. तुम्हाला सवय आहे दिवसातून चार वेळा उठलं की बूम तोंडाजवळ घ्यायची. आम्हाला तशी सवय नाही. पंतप्रधान बोलतात लोकांशी, मन की बात मधून बोलतात, ते सगळ्यांशी बोलतात. दादर पोलिसांच्या कृत्यावर योग्य ती कारवाई होईल मुंबईत पोलिसांनी महिला आंदोलकांवर गैरवर्तन केले आहे आणि त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी केली आहे. त्यावर गिरीश महाजन म्हणाले, जे चूक असेल ते चूक आहे. हे सगळं आधी तपासले जाईल. स्वतः मुख्यमंत्री याविषयी गंभीर आहेत. जर कोणी चुकीचे काम करत असेल तर कोणालाही सोडले जाणार नाही. ते जे काही दाखवले गेले ते खरे असेल तर नक्कीच कारवाई होईल. ठाकरेंच्या आंदोलनावर काय म्हणाले महाजन? आज ठाकरे बंधूंचा मोर्चा आहे, त्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले, त्यांना बिचाऱ्यांना संधी मिळाली आहे. आता त्यांच्या मागे कोणी राज्यामध्ये राहिलेले नाही, खासदार राहिलेले नाहीत, आमदार राहिलेले नाहीत, एक महापालिका आलेली नाही. नगरपालिका बोटावर मोजण्या एवढ्याच आलेल्या आहेत. त्यामुळे ते अस्वस्थ झालेले आहेत. त्यामुळे आता रस्त्यावर कसे जाऊ, लोकांमध्ये कसे जाऊ आणि त्यामुळे ही त्यांना संधी मिळाली. त्यांच्या मागे कोणीही राहिलेले नाही म्हणून ‘बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना’, असे त्यांचे सुरू आहे. टीईटी घोटाळा झाला तेव्हा रस्त्यावर का नाही उतरले? पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, त्यांचे सरकार असताना टीईटीचा एवढा मोठा घोटाळा झाला, त्याचे उत्तर द्या, सगळ्यात मोठा घोटाळा झाला. त्यावेळेला का नाही रस्त्यावर उतरले तुम्ही? विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन गोळी मारण्याचा हा प्रकार चाललेला आहे. त्यांना आता गुदगुल्या होत आहेत, उद्या काय करायचं, पोरांना सोबत घेऊन त्यांना कसे चेतवायचं, गोंधळ कसा निर्माण करायचा राज्यात आणि देशात, हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न चाललेला आहे आणि त्यात ते यशस्वी होणार नाहीत, असे महाजन यांनी म्हटले आहे. वारीचे नियोजन अतिशय सुंदर झालेय एका वृत्तवाहिनीला बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी वारीच्या नियोजनाविषयी सांगितले की, वारीचे नियोजन अतिशय सुंदर असे झाले आहे. माननीय मुख्यमंत्री दुपारी येणार आहेत. उद्या पहाटे त्यांच्या हस्ते पूजा होणार आहे. यावेळी रेकॉर्ड तोड गर्दी होणार असून किमान 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त गर्दी होणार आहे. सर्व व्यवस्था शासनाने व प्रशासनाने याठिकाणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील याचा आढावा घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुनेत्रा पवार यांच्याकडून देखील याचा आढवा घेतला जात आहे. दरम्यान, गिरीश महाजन आज सोलापूर येथे वारीचे नियोजन पाहण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
Source link
"बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना…":ठाकरे बंधूंच्या मोर्चावरून गिरीश महाजनांचा खोचक टोला, संजय राऊतांवरही टीका