Headlines

बेबी फूड कंपन्यांना FDA चा दणका:पॅकेजिंग-जाहिरातींवर कडक नियम, तुकाराम मुंढेंनी सांगितले 5 महत्त्वाचे बदल




शिशुंसाठी वापरल्या जाणाऱ्या फॉर्म्युला मिल्क आणि इतर बेबी फूड उत्पादनांबाबत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कडक नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उत्पादनांच्या पॅकेजवर ‘आईचे दूध हे शिशूसाठी सर्वोत्तम दूध आहे’ असा स्पष्ट संदेश देणे बंधनकारक असेल. तसेच आई आणि बाळाचे फोटो, आईच्या दुधाशी तुलना करणाऱ्या जाहिराती, मोफत नमुने आणि कूपन यावरही निर्बंध असतील. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, राज्यातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे, हा अन्न व औषध प्रशासनाचा उद्देश आहे. आतापर्यंत विभागाने विविध विषयांवर 22 रेग्युलेशन आणि 11 ऑर्डर काढल्या आहेत. शाळांमधील आहार, पनीर यांसारख्या विषयांवर काढलेल्या आदेशांचा परिणामही दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. दोन वर्षांपर्यंतच्या बालकांसाठीही नियम यापूर्वी शाळांशी संबंधित आहाराबाबतचा आदेश 2 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांपासून 18 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी लागू करण्यात आला होता. मात्र, दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांसाठीही आहाराशी संबंधित नियम आवश्यक असल्याचे FDAच्या पाहणीत समोर आले. त्यामुळे नवजात बालकांपासून दोन वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी वापरल्या जाणाऱ्या शिशु आहार उत्पादनांबाबत स्वतंत्र नियम करण्यात आले आहेत. यामध्ये शिशु फॉर्म्युला, शिशु दूधअन्न आणि सहा महिन्यांनंतर दिले जाणारे पूरक आहार यांसारख्या उत्पादनांचा समावेश आहे. फॉर्म्युला मिल्कवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र, त्याचा वापर आणि त्यासंबंधीची माहिती देताना निर्धारित नियमांचे पालन करावे लागणार आहे. पॅकेजवर ‘आईचे दूध सर्वोत्तम’ लिहिणे बंधनकारक FDAच्या तपासणीत काही शिशु आहार उत्पादनांच्या पॅकेजिंगवर आवश्यक सूचना स्पष्टपणे दिल्या जात नसल्याचे आढळले. त्यामुळे आता या उत्पादनांच्या पॅकेजवर बालकाला हे अन्न कधी आणि कोणत्या पद्धतीने द्यावे, याबाबत आवश्यक माहिती देणे बंधनकारक असेल. तसेच पॅकेजच्या पुढील भागावर आईचे दूध हे शिशूसाठी सर्वोत्तम दूध आहे, असा स्पष्ट संदेश देणे आवश्यक असेल. वैद्यकीय सल्ल्यानुसार उत्पादनाचा वापर करावा, हेही नमूद करावे लागणार आहे. तुकाराम मुंढे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार शिशु आहार उत्पादनांच्या पॅकेजिंगवर पुढील बाबी स्पष्ट कराव्या लागतील : बेबी फूडसाठी 5 महत्त्वाचे नियम ‘आईचे दूध हे शिशूसाठी सर्वोत्तम दूध आहे’ असा संदेश पॅकेजच्या पुढील भागावर द्यावा लागेल.
उत्पादनाचा वापर वैद्यकीय सल्ल्यानुसार करावा, अशी सूचना द्यावी लागेल.
हे उत्पादन आईच्या दुधाचा एकमेव पर्याय नाही, हे स्पष्ट करावे लागेल.
हे पूरक आहार असून सहा महिन्यांनंतर वापर करावा, अशी माहिती द्यावी लागेल.
उत्पादनाच्या पॅकेजवर आई आणि बाळाचा फोटो वापरता येणार नाही.
आईच्या दुधाशी तुलना करणाऱ्या जाहिरातींवरही निर्बंध शिशु आहार उत्पादनांची जाहिरात करताना ती उत्पादने आईच्या दुधाइतकीच किंवा त्याच्या समकक्ष असल्याचे भासवता येणार नाही. अशा प्रकारच्या प्रचारावर निर्बंध असतील. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोफत नमुने, कूपन किंवा अशा प्रकारच्या प्रोत्साहन योजनांचा वापर करता येणार नाही. या नियमांचा पुरवठादार, ब्रँड मालक आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून उत्पादन विकणाऱ्या विक्रेत्यांनाही लागू होणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. शहरी भागात स्तनपानाचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा कमी पत्रकार परिषदेत तुकाराम मुंढे यांनी स्तनपानासंदर्भातील आकडेवारीही मांडली. त्यांच्या माहितीनुसार, राज्यात सहा महिन्यांखालील बालकांना केवळ आईचे दूध देण्याचे प्रमाण मागील काही वर्षांत घटले आहे. त्यांनी हे प्रमाण सुमारे 63.7 टक्क्यांवरून 55 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे सांगितले. यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागात मोठी तफावत असल्याचेही त्यांनी नमूद केले. शहरी भागात सुमारे 52 टक्के, तर ग्रामीण भागात सुमारे 75 टक्के स्तनपानाचे प्रमाण असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शहरी भागातील मातांमध्ये स्तनपानाबाबत अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे या आकडेवारीतून दिसून येते. बाळाच्या जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान महत्त्वाचे बाळाच्या जन्मानंतर शक्य तितक्या लवकर स्तनपान सुरू करणे महत्त्वाचे असल्याचे मुंढे यांनी सांगितले. जन्मानंतर पहिल्या तासात बाळाला आईचे दूध मिळणे अपेक्षित असते. मात्र, राज्यातील सुमारे निम्म्या मातांकडून जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान होत नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे रुग्णालये आणि आरोग्य यंत्रणेकडून मातांना स्तनपानाचे महत्त्व आणि योग्य पद्धत याबाबत पुरेशी माहिती दिली जाते का, याकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. चुकीच्या आहाराचा आरोग्यावर परिणाम? लहान वयातील आहाराचा पुढील आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असा मुद्दाही मुंढे यांनी मांडला. त्यांच्या म्हणण्यानुसार, 10 ते 12 वर्षांच्या मुलांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण सुमारे 35 टक्के, तर 10 ते 19 वर्षांच्या वयोगटात मधुमेहाचे प्रमाण सुमारे 12.3 टक्के असल्याची आकडेवारी त्यांनी दिली. लहान मुलांना योग्य पोषण मिळणे आणि त्यांच्या आहाराबाबत पालकांना अचूक माहिती मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे शिशु आहार उत्पादनांवर स्पष्ट सूचना देणे आणि त्याच्या जाहिरातींवर नियंत्रण ठेवणे हा या निर्णयामागचा प्रमुख उद्देश असल्याचे FDAकडून स्पष्ट करण्यात आले आहे. फॉर्म्युला मिल्कवर बंदी नाही, मात्र नियमांचे पालन आवश्यक तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, फॉर्म्युला मिल्कवर बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र, अशा उत्पादनांचा वापर करताना त्यावरील नियम आणि आवश्यक सूचना पाळणे बंधनकारक असेल. उत्पादनाची माहिती, वापराची योग्य वेळ आणि वैद्यकीय सल्ल्याची आवश्यकता याबाबत ग्राहकांना स्पष्ट माहिती मिळावी, यावर FDAचा भर आहे. या निर्णयामुळे शिशु आहार उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या, ब्रँड मालक, वितरक, पुरवठादार तसेच ऑनलाइन विक्री करणाऱ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही नियमांचे पालन करण्याची जबाबदारी राहणार आहे. हेही वाचा…. माजी अग्निवीरांना शासकीय नोकरीत आरक्षण:कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांची निर्मिती; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय राज्यातील 256 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीपुरवठा आणि विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, दुष्काळ जाहीर न झालेल्या उर्वरित तालुक्यांमधील शेतकऱ्यांनाही दिलासा व मदत देण्याच्या अनुषंगाने या बैठकीत महत्त्वपूर्ण विचारविनिमय झाला. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *