Headlines

​'भंडारा-गोंदिया'त अखेरच्या दिवशी हायव्होल्टेज ड्रामा:काँग्रेसकडून दोन उमेदवार रिंगणात, नाना पटोलेंचा 'डबल गेम' की अंतर्गत धुसफूस?​




स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या अंतिम दिवशी भंडारा-गोंदिया मतदारसंघात अत्यंत नाट्यमय आणि अनपेक्षित घडामोडी घडल्या आहेत. महायुतीकडून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून अविनाश ब्राह्मणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असतानाच, महाविकास आघाडी आणि विशेषतः काँग्रेसने राजकीय पंडितांना चक्रावून टाकणारी खेळी खेळली आहे. काँग्रेसकडून अर्जुनी/मोरगावचे माजी आमदार दिलीप बन्सोड यांचा अधिकृत अर्ज दाखल करण्यात आला, तर दुसरीकडे नाना पटोले यांनी आधी जाहीर केलेले उमेदवार प्रफुल्ल अग्रवाल यांचा ‘काँग्रेस समर्थित’ उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे, या दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करतेवेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वतः उपस्थित होते.​ नाना पटोलेंच्या डोक्यात ‘वेगळं’ आणि ओठात ‘वेगळं’!​ राजकीय डावपेच खेळण्यात माहीर मानल्या जाणाऱ्या नाना पटोलेंनी एकाच वेळी दोन उमेदवार रिंगणात ठेवून महायुतीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. इतिहास साक्षी आहे की, मागील विधान परिषद निवडणुकीच्या वेळी नाना पटोले भाजपमध्ये खासदार होते; तेव्हा भाजपचे संख्याबळ नसतानाही पटोलेंच्या राजकीय करिश्म्यामुळे तत्कालीन भाजप उमेदवार डॉ. परिणय फुके दुसऱ्या पसंतीची मते घेऊन विजयी झाले होते. आज महाविकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत नसतानाही पटोलेंनी थेट दोन उमेदवार मैदानात उतरवले आहेत. यावरून “नानांच्या डोक्यात वेगळं आणि ओठात वेगळं” असून, त्यांनी पडद्यामागे मोठी व्यूहरचना आखल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.​ भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांच्या ‘स्टेटस’मुळे महायुतीत कलह.?​ एकीकडे काँग्रेसचे अंतर्गत राजकारण तापलेले असताना, महायुतीमध्येही सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र समोर आले आहे. भाजप उमेदवारीसाठी ज्या नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा होती, त्यातील भाजपच्या एका माजी जिल्हाध्यक्षांच्या व्हॉट्सॲप स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. या स्टेटसवरून ते अत्यंत नाराज असल्याचे उघडपणे दिसून येत असून, ही अंतर्गत नाराजी भाजपला महाग पडू शकते.​ ‘नाराज’ आणि ‘मित्रपक्षांवर’ भाजपचे भवितव्य!​ भंडारा-गोंदियातील सध्याचे संख्याबळ पाहता भाजपचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचे भवितव्य आता पूर्णपणे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या मतदानावर अवलंबून आहे. त्यातच भाजपमधील इच्छुक आणि आता नाराज झालेल्या नेत्यांनी जर मतदानात ‘गेम’ केला, तर महायुतीला मोठा फटका बसू शकतो.​ विरोधकांकडे बहुमत नसले तरी महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आणि मित्रपक्षांची भूमिका यावरच या निवडणुकीचा निकाल ठरणार आहे. जर ही नाराजी कायम राहिली, तर नाना पटोले आपल्या गुप्त डावपेचात पुन्हा एकदा यशस्वी होऊन महायुतीला ‘चेकमेट’ देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीतील चुरस आता शिगेला पोहोचली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *