![]()
नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात महायुतीमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) निधी वाटपातील दुजाभावावर बोलताना विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना चक्क व्यासपीठावरच रडू कोसळले. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत रघुवंशी यांच्या अश्रूंचा बांध फुटल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ‘आम्ही दोन आमदार असूनही शिवसेनेला न्याय देऊ शकत नाही’ शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबारमधील निधी वाटपाचे गणित मांडले. जिल्ह्यात सध्या सत्ताधारी पक्षांचे 3 आमदार असून त्यापैकी 1 आमदार शिवसेनेचा आणि 2 आमदार भाजपचे असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या निकषांनुसार विधानसभेच्या आमदारांना निधी देण्यात येतो. त्यातील 20 टक्के निधी आमदारांच्या माध्यमातून वितरित केला जातो, तर उर्वरित निधीपैकी 30 टक्क्यांवर पालकमंत्र्यांचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित निधीमध्ये विविध पक्षांच्या नेत्यांचा आणि लोकप्रतिनिधींचा विचार होतो. मात्र, या पद्धतीमुळे शिवसेनेच्या वाट्याला अत्यल्प निधी येत असल्याचा रघुवंशींचा आरोप आहे. “आज दुर्दैवाने मी आणि आमचे दादा 2 आमदार आहोत, पण आम्ही शिवसेनेला न्याय देऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे,” असे म्हणताना ते भावुक झाले. ‘कार्यकर्त्यांच्या मतदारसंघात कामे झाली नाहीत तर जिल्हा परिषद कशी ताब्यात येणार?’ निधी वाटपातील असमानतेचा थेट परिणाम पक्षाच्या संघटनेवर होत असल्याचेही रघुवंशी यांनी स्पष्ट केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, धडगाव-अक्कलकुवा या 2 तालुक्यांचा त्यांचा मतदारसंघ आहे. दुसरीकडे तळोदा, शहादा, नंदुरबार आणि नवापूर या 4 तालुक्यांमध्ये मोठ्या संख्येने जिल्हा परिषद सदस्यांचे मतदारसंघ आहेत. मात्र, या भागांमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मतदारसंघात विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे. “17 जिल्हा परिषद सदस्यांच्या मतदारसंघात निधी दिला आणि 39 मतदारसंघांमध्ये जर एकही भेटणार नसेल, तर जिल्हा परिषद आमच्या ताब्यात कशी येईल?” असा सवाल त्यांनी केला. पक्षाच्या कार्यकर्त्यांची ताकद असूनही त्यांच्या भागात प्रत्यक्ष विकासकामे झाली नाहीत तर त्याचा संघटनेला राजकीय फटका बसू शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. भाजपकडे भरपूर निधी, राष्ट्रवादीकडे पालकमंत्र्यांचा निधी; शिवसेनेच्या वाट्याला काय? रघुवंशी यांनी नंदुरबारमधील सत्ताधारी पक्षांच्या निधी वाटपाचे राजकीय समीकरणही मांडले. भाजपचे 2 आमदार असल्याने त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार नसला तरी पालकमंत्र्यांकडे असलेल्या 30 टक्के निधीमुळे त्या पक्षालाही कामांसाठी संधी मिळते. मात्र, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना तुलनेने कमी निधी मिळत असल्याची त्यांची नाराजी आहे. “सर्व नेते, सर्व कार्यकर्ते पैसे खायला मागत नाहीत. गावाच्या विकासासाठी काही ना काहीतरी दिलं पाहिजे,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे विधानसभेच्या आमदारांच्या निकषावरच निधी देण्याऐवजी पक्षाची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघांचा विचार करून निधीचे वाटप करावे, अशी मागणी त्यांनी केली. पक्षाची संघटना वाढत नाही, यामागे हेच एकमेव कारण निधीअभावी नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेची संघटना वाढत नसल्याचा थेट दावा रघुवंशी यांनी केला. कार्यकर्त्यांना त्यांच्या भागात विकासकामे करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी निधी उपलब्ध नसल्यास पक्षाच्या राजकीय विस्तारावर मर्यादा येतात, असे त्यांनी सांगितले. “जिल्ह्यामध्ये पक्षाची संघटना वाढत नाही, त्याचं एकमेव कारण हेच आहे,” असे म्हणत त्यांनी निधी वाटपाच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली. ही मागणी त्यांनी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि गुलाबराव पाटील यांच्यासमोरच केल्याने नंदुरबारमधील महायुतीच्या अंतर्गत राजकारणाची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेला पक्षनिहाय निधी द्या रघुवंशी यांनी मंत्र्यांकडे आपली मागणी स्पष्टपणे मांडताना इतर जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारची पद्धत असेल तर त्याचा पुनर्विचार करण्याची विनंती केली. विधानसभेच्या आमदारांच्या मतदारसंघापुरता निधी मर्यादित न ठेवता पक्षाच्या संघटनेनुसार आणि स्थानिक गरजेनुसार निधी देण्याची भूमिका त्यांनी मांडली. निधी हा केवळ राजकीय कार्यकर्त्यांच्या मागण्यांसाठी नसून गावातील रस्ते, पाणी, मूलभूत सुविधा आणि इतर विकासकामांसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नंदुरबारच्या औद्योगिक विकासावरही भर दरम्यान, मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्हा गुंतवणूक परिषदही पार पडली. या परिषदेत जिल्ह्यातील औद्योगिक संधी, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीबाबत उद्योजकांशी चर्चा झाली. या परिषदेत 123 सामंजस्य करार (MoU) झाले असून, त्यातून सुमारे ₹5,004 कोटींची गुंतवणूक प्रस्तावित असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. या गुंतवणुकीतून 7,778 रोजगारांच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः वस्त्रोद्योग क्षेत्रात ₹4,787 कोटींची गुंतवणूक प्रस्तावित असल्याचेही त्यांनी सांगितले. एका बाजूला जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी मोठ्या गुंतवणुकीची चर्चा सुरू असताना दुसऱ्या बाजूला स्थानिक पातळीवर विकासकामांसाठी निधी वाटपावरून सत्ताधारी महायुतीतीलच लोकप्रतिनिधी नाराजी व्यक्त करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. महायुतीतील अंतर्गत समन्वयाचा प्रश्न ऐरणीवर चंद्रकांत रघुवंशी यांच्या भावनिक वक्तव्यामुळे केवळ निधी वाटपाचा प्रश्न समोर आलेला नाही, तर महायुतीतील स्थानिक पातळीवरील समन्वयाचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना हे दोन्ही घटक सत्तेत असताना विकासनिधीचे वाटप कोणत्या सूत्राने करायचे, यावरून मतभेद असल्याचे या घटनेतून दिसून आले. विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक महत्त्वाचा ठरू शकतो. कार्यकर्त्यांना विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देणे आणि त्यातून पक्षाची संघटना मजबूत करणे, हा प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाचा राजकीय मुद्दा असतो. त्यामुळे रघुवंशी यांनी मांडलेली नाराजी केवळ एका आमदाराची वैयक्तिक तक्रार न राहता शिवसेनेच्या जिल्ह्यातील संघटनात्मक राजकारणाशी जोडली गेली आहे. आता उदय सामंत आणि गुलाबराव पाटील या दोन्ही मंत्र्यांकडून रघुवंशी यांच्या मागणीवर काय भूमिका घेतली जाते आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाच्या सूत्रात काही बदल होतो का, याकडे नंदुरबारच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा… भाजपचा बडा नेता काँग्रेसमध्ये येणार होता, पण…:पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट; सद्य:स्थितीला ‘लोकशाही’ म्हणणे धाडसाचेच “आज देशात जे काही सुरू आहे, त्याला ‘लोकशाही’ म्हणायला फार मोठे धाडस लागेल. कोणत्याही राजकीय पक्षात आता अंतर्गत लोकशाही उरलेली नाही, हे मी अत्यंत धाडसाने सांगतोय,” अशी खळबळजनक आणि थेट प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी चव्हाणांनी केवळ सध्याच्या राजकीय स्थितीवरच कोरडे ओढले नाहीत, तर न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, मीडियावरील नियंत्रण आणि 2013 मधील एका भाजप नेत्याच्या पक्षांतराच्या गुप्त कटाचा मोठा गौप्यस्फोटही केला. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
भरसभेत दोन मंत्र्यांसमोर शिंदेंच्या आमदाराला रडू कोसळलं!:आमदारकी असूनही कार्यकर्त्यांना काय तोंड दाखवू? निधी वाटपावरून महायुतीत भडका