Headlines

भारत सासणे- 'उत्तम विनोद, रहस्यकथांची निर्मिती आवश्यक':मसापचा विशेष साहित्य पुरस्कार प्रदान; टाकसाळे, वागळे सन्मानित




ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी उत्तम विनोद आणि बुद्धीरंजन करणाऱ्या रहस्यकथांच्या निर्मितीची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे (मसाप) आयोजित विशेष साहित्य पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. यावेळी मुकुंद टाकसाळे यांना पी. जी. वुडहाऊस पुरस्कार तर सौरभ वागळे यांना अगाथा ख्रिस्टी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सासणे म्हणाले की, रहस्यकथा बुद्धीला चालना देतात आणि चांगला विनोद तणाव कमी करतो. समाजात द्वेष, संभ्रम आणि गोंधळाची स्थिती असताना तणावमुक्त करणारा विनोद आणि बुद्धीरंजन करणाऱ्या रहस्यकथांची नितांत गरज असते. लेखक मुकुंद टाकसाळे आणि सौरभ वागळे यांनी आपल्या लेखनातून ही गरज पूर्ण करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हे पुरस्कार सासणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट विनोदी लेखनासाठीचा पी. जी. वुडहाऊस विशेष साहित्य पुरस्कार रा. द. पुसाळकर यांच्या स्मृत्यर्थ, तर उत्कृष्ट रहस्यकथालेखनासाठीचा अगाथा ख्रिस्टी पुरस्कार इंदुमती पुसाळकर यांच्या स्मृत्यर्थ पुरस्कृत करण्यात आला आहे. याप्रसंगी देणगीदार आणि ज्येष्ठ लेखिका भारती पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मसापचे कार्यवाह सुनील महाजन अध्यक्षस्थानी होते, तर सुनेत्रा मंकणी आणि अंजली कुलकर्णी हेही उपस्थित होते. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र आणि आठ हजार रुपये असे होते. हा समारंभ साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. सासणे यांनी मराठीतील रहस्यकथालेखनाची परंपरा आणि विनोदी लेखन करणाऱ्या पूर्वसुरींचा आदरपूर्वक उल्लेख केला. विनोदी लेखनाची परंपरा सध्या क्षीण झाल्याचे त्यांनी नमूद केले. निर्विष विनोद समाजातील ताण कमी करतो. सध्या विरोधाभासांत विभागलेला समाज दुःखी असून, तो हसणे विसरला आहे. त्यामुळे टाकसाळे यांनी पुन्हा उत्तम विनोदी कादंबरीलेखन करून हसण्याचे पुनरुज्जीवन करावे, असे आवाहन त्यांनी केले. मराठीत रहस्यकथालेखन तुलनेने चांगले होत आहे. सौरभ वागळे यांच्या ‘अल्फा’ या रहस्यकथानायकाच्या मालिका याव्यात आणि त्यांचे अनुवादही व्हावेत, अशी अपेक्षा सासणे यांनी व्यक्त केली. मनोगत व्यक्त करताना सौरभ वागळे म्हणाले की, वडिलांनी रहस्य आणि विज्ञानकथांचा संग्रह केल्यामुळे त्यांना या साहित्यप्रकाराची गोडी लागली. त्यातूनच त्यांचे लेखन पुढे आले. ‘अनिकेत लक्ष्मण फाळके’ उर्फ ‘अल्फा’ या नायकाची ९ पुस्तके सध्या उपलब्ध असून, वाचकांच्या उत्तम प्रतिसादामुळे पुढील भागही येत राहतील. त्यांच्या लेखनाला अगाथा ख्रिस्टी यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा मोठा गौरव असल्याचे त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *