![]()
सिल्लोड तालुक्यातील शिवना येथिल ग्रामदैवत श्री. शिवाई देवी मंदिरालगतची १५ गुंठे जमीन शिवना येथील भूमिपुत्र तथा डोंबिवली येथिल व्यावसायिक कैलाश श्रीरंग काळे यांनी संस्थानला दान केली. त्यानिमित्त काळे यांचा संस्थान व समस्त ग्रामस्थांच्या वतीने रविवारी सत्कार करण्यात आला. शिवना गावाच्या पश्चिमेला ग्रामदैवत श्री. शिवाई देवीचे पुरातन मंदिर आहे. मंदिराला नुकताच शासनाकडून तीर्थक्षेत्राचा ‘क’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. मंदिरासमोर एक पुरातन बारव आहे. या परिसरात दरवर्षी चैत्र पौर्णिमेला शिवाई देवीची मोठी यात्रा भरते. लाखो भाविकांच्या उपस्थितीत वगदी मिरवणुक याच मैदानात निघते. तसेच नवरात्र उत्सवात सुद्धा हा परिसर भाविकांनी फुलून जातो. गावात प्रवेश करताना उजव्या बाजूला मंदिर व रोडच्या डाव्या बाजूला शांताबाई वैजिनाथ कादी यांच्या नावे १५ गुंठे जमीन आहे. ही जमीन शिवना येथिल कैलाश श्रीरंग काळे यांनी खरेदी करून सदर जमीन रविवारी सकाळी श्री. शिवाई देवी मंगल कार्यालयात ग्रामस्थांच्या व गावातील सर्वपक्षीय नेते, नागरिक आणि मंदिर विश्वस्त समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही पंधरा गुंठे जमीन त्यांनी श्री. शिवाई देवीच्या चरणी अर्पण करत असल्याचे जाहीर केले. ‘बोल शिवाबाई की जय…’च्या जयघोषात त्यांच्या या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले. त्यांच्या या दातृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ग्रामस्थांतर्फे त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
Source link
भाविकाने शिवाई संस्थानला 15 गुंठे जमीन केली दान:शिवना येथील ग्रामस्थांकडून कैलाश काळे यांचा सत्कार