![]()
प्रस्तावित आरापूर औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याच्या दृष्टीने प्रशासन आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने शेतकऱ्यांशी पुन्हा थेट संवाद साधण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रविवार, २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता लासूर स्टेशन येथील पांडव लॉन्समध्ये शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूसंपादन वाटाघाटीसाठी संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीस छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी डॉ. विनय गौडा, आमदार प्रशांत बंब, उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जराड यांच्यासह संबंधित तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल प्रशासन आणि एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. पावसाचे दिवस असल्याने सुरक्षेचा व सोयीचा विचार करून आरापूरऐवजी लासूर स्टेशन येथील पांडव लॉन्समध्ये ही बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, ही प्रस्तावित औद्योगिक वसाहत कोणत्याही परिस्थितीत आरापूर येथेच विकसित करण्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन करून विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकारी गावपातळीवरही बैठका घेणार आहेत. यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र हजारे यांच्या उपस्थितीत भूसंपादनाचा आढावा घेण्यात आला होता. त्या वेळी आमदार बंब, जिल्हाधिकारी डॉ. गौडा, उपजिल्हाधिकारी बंगाळे व विभागीय अधिकारी अमित भामरे उपस्थित होते. संवादाच्या माध्यमातून मार्ग काढून भूसंपादन सुरळीत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याने २ ऑगस्टच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ७०० हेक्टर क्षेत्रावरची संयुक्त मोजणी झाली पूर्ण आरापूर, गवळीशिवरा आणि सुलतानाबाद परिसरातील सुमारे ७६२ हेक्टर क्षेत्रात ही औद्योगिक वसाहत उभारण्याचे प्रस्तावित असून यासाठी भूसंपादन प्रक्रिया वेगाने सुरू आहे. आतापर्यंत प्रशासनाने जवळपास ७०० हेक्टर क्षेत्राची संयुक्त मोजणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. मात्र, जमिनीच्या योग्य मोबदल्याच्या दरावर अद्याप शेतकरी आणि प्रशासनात एकमत न झाल्यामुळे पुढील प्रत्यक्ष भूसंपादनाची कार्यवाही रखडली आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होेतो याची प्रतीक्षा आहे.
Source link
भूसंपादनासाठी शेतकऱ्यांसोबत पुन्हा होणार संवाद:लासूर येथे 2 ऑगस्टला आमदार, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक