![]()
महिलांच्या लैंगिक शोषणासह विविध गंभीर आरोपांमुळे चर्चेत आलेल्या अशोक खरात प्रकरणात नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात बुधवारी महत्त्वाची सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपीच्या वकिलांना तपासातील व्हिडीओ पुरावे पाहण्याची परवानगी दिली असून, संबंधित पेनड्राईव्ह आणि कागदपत्रे सरकारी पक्षाने आरोपीच्या वकिलांना उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश दिले आहेत. मात्र, व्हिडीओची प्रत आरोपी किंवा त्याच्या वकिलांना देऊ नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणात न्यायमूर्ती एन. एल. मोरे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी पक्षाकडून तपासी अधिकारी तसेच विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम न्यायालयात उपस्थित होते. आरोपी अशोक खरात यालाही प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला मास्क लावून न्यायालयात आणण्यात आले. पेनड्राईव्हमधील व्हिडीओ पाहण्याची परवानगी सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलांकडून तपासात समाविष्ट असलेल्या व्हिडीओ पुराव्यांची मागणी करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने सरकारी पक्षाला संबंधित पेनड्राईव्ह आणि आवश्यक कागदपत्रे आरोपीच्या वकिलांना देण्याचे निर्देश दिले. मात्र, या व्हिडीओ पुराव्यांच्या प्रती आरोपी किंवा त्याच्या वकिलांना देता येणार नाहीत. वकिलांना न्यायालयाने निश्चित केलेल्या प्रक्रियेनुसार हे व्हिडीओ केवळ पाहता येतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले. पुराव्यांच्या हाताळणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले. सरकारी पक्षाकडील पुरावे वकिलांना उपलब्ध अशोक खरातविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान पोलिसांनी विविध कागदपत्रांसह इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पुरावे जमा केले आहेत. या पुराव्यांचा बचाव पक्षाला अभ्यास करता यावा, यासाठी न्यायालयाने संबंधित सामग्री पाहण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रक्रियेमुळे आरोपीच्या वकिलांना सरकारी पक्षाच्या तपासातील पुराव्यांची माहिती घेता येणार आहे. मात्र, व्हिडीओची डिजिटल कॉपी बाहेर देण्यास न्यायालयाने स्पष्टपणे मनाई केली आहे. जामीन अर्जावर 3 ऑक्टोबरला निकाल दरम्यान, अशोक खरातच्या जामीन अर्जावरही न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. त्याच्या पहिल्या गुन्ह्यातील जामीन अर्जावर 3 ऑक्टोबर रोजी निकाल देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील न्यायालयीन निर्णयाकडे लक्ष लागले आहे. सरकारी पक्षाकडून अशोक खरातच्या जामिनाला विरोध करण्यात आला आहे. या प्रकरणात राज्य सरकारने अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. 8 ऑक्टोबरला उर्वरित गुन्ह्यांवर सुनावणी अशोक खरातविरोधात नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि अहिल्यानगर परिसरात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती यापूर्वी समोर आली आहे. त्यापैकी काही गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथकाकडे आहे. या प्रकरणातील उर्वरित गुन्ह्यांबाबत पुढील सुनावणी 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे एकीकडे 3 ऑक्टोबरला जामीन अर्जावर होणारा निकाल आणि त्यानंतर 8 ऑक्टोबरला होणारी सुनावणी या दोन्ही तारखांना महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, अशोक खरात प्रकरणात महिलांचे लैंगिक शोषण, अंधश्रद्धा आणि आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हे आरोप न्यायालयीन प्रक्रियेत असून, त्याबाबत अंतिम निष्कर्ष न्यायालयाच्या निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहेत. हेही वाचा…. सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील मतभेद चव्हाट्यावर:पुरुषोत्तम जगतापांचा स्वतंत्र पॅनेल, जय पवार म्हणाले, ‘अशी भूमिका घेतील असे वाटले नव्हते’ सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी पक्षाच्या अधिकृत पॅनेलपासून वेगळी भूमिका घेत स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या पॅनेलला भाजपचे नेते संजय जगताप यांची साथ मिळाली आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याची निवडणूक आता तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील मतभेद चव्हाट्यावर:पुरुषोत्तम जगतापांचा स्वतंत्र पॅनेल, जय पवार म्हणाले, ‘अशी भूमिका घेतील असे वाटले नव्हते’ सविस्तर वाचा…
Source link
भोंदू अशोक खरातचे व्हिडीओ वकिलांना दाखवा:पेनड्राईव्ह सुपूर्द करण्याचे कोर्टाचे आदेश, जामीन अर्जावर 3 ऑक्टोबरला निकाल