![]()
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी पक्षाच्या अधिकृत पॅनेलपासून वेगळी भूमिका घेत स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या पॅनेलला भाजपचे नेते संजय जगताप यांची साथ मिळाली आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याची निवडणूक आता तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जय पवार यांनी पुरुषोत्तम जगताप यांच्या भूमिकेबाबत खंत व्यक्त केली आहे. जगताप यांच्याशी शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्या मनात काही मुद्द्यांबाबत नाराजी असल्याने ते एकत्रितपणे निवडणूक लढण्यास तयार झाले नाहीत, असे जय पवार यांनी सांगितले. शेवटपर्यंत एकत्र आणण्याचा प्रयत्न सोमेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. पवार कुटुंबातील दोन्ही गटांमध्ये याबाबत चर्चा झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानीही बैठक झाली होती. जागावाटप आणि उमेदवारांची निवड यावर एकमत करण्यासाठी विविध पातळ्यांवर चर्चा सुरू होती. मात्र, उमेदवारांची नावे आणि पॅनेलच्या रचनेवर अंतिम सहमती होऊ शकली नाही. त्यानंतर पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनेल उभे करण्याचा निर्णय घेतला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोरील अडचणी वाढल्या. जय पवार यांनी सांगितले की, “पुरुषोत्तम जगताप यांच्याशी काल रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली. आजही संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या मनात काही मुद्द्यांबाबत खंत असल्याने ते एकत्रितपणे निवडणूक लढण्यास तयार झाले नाहीत.” ‘अजितदादांनी त्यांना कायम साथ दिली’ पुरुषोत्तम जगताप आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संबंधांचा उल्लेख करत जय पवार यांनी जगताप यांच्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केले. “अजितदादांनी पुरुषोत्तम जगताप यांना कायम साथ दिली. त्यामुळे ते अशी भूमिका घेतील, असे आम्हाला वाटले नव्हते,” असे जय पवार म्हणाले. मात्र, जगताप यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे स्वतंत्र भूमिका घेतली, याबाबत जय पवार यांनी थेट भाष्य केले नाही. “त्यांच्या भूमिकेबाबत त्यांनाच विचारा,” असे त्यांनी स्पष्ट केले. जगतापांनी दिली होती 12 नावांची यादी पॅनेलच्या चर्चेदरम्यान पुरुषोत्तम जगताप यांनी त्यांच्या पसंतीची 12 नावे दिली होती. मात्र, उमेदवारांची अंतिम निवड सर्वांनी एकत्र बसून करणे अपेक्षित होते, अशी भूमिका जय पवार यांनी मांडली. राष्ट्रवादीच्या अधिकृत यादीत पुरुषोत्तम जगताप यांचे नावही होते. त्यामुळे त्यांच्याशी शेवटपर्यंत चर्चा सुरू होती. मात्र, या चर्चेतून तोडगा निघाला नाही आणि अखेर जगताप यांनी स्वतंत्र पॅनेल उभे केले. जगतापांच्या पॅनेलला भाजपची साथ पुरुषोत्तम जगताप यांनी राष्ट्रवादीपासून वेगळी भूमिका घेतल्यानंतर त्यांच्या पॅनेलला भाजपचे नेते संजय जगताप यांची साथ मिळाली. त्यामुळे या निवडणुकीचे राजकीय चित्र आणखी बदलले आहे. पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनेलसोबत पुरंदर तालुक्यातील शरद पवार गटातील काही नेतेही गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे एका बाजूला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती आहे, तर दुसऱ्या बाजूला युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पॅनेल मैदानात आहे. तिसऱ्या बाजूला पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पाठिंब्याचे पॅनेल आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि पुरुषोत्तम जगताप-भाजप समर्थित पॅनेल अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. नवीन आणि अनुभवी चेहऱ्यांचा समावेश अधिकृत पॅनेलची रचना करताना नवीन तसेच अनुभवी कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जय पवार यांनी सांगितले. खासदार पार्थ पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये याबाबत चर्चा झाली होती. कारखाना चालवताना अनुभवी लोकांची आवश्यकता असते. त्याचबरोबर नवीन कार्यकर्त्यांनाही संधी मिळावी, असा विचार करून पॅनेल तयार करण्यात आल्याचे जय पवार यांनी स्पष्ट केले. “भविष्यात शेतकऱ्यांना चांगला दर कसा देता येईल आणि कारखाना अधिक सक्षमपणे कसा चालवता येईल, याचा विचार करून पॅनेलची रचना करण्यात आली,” असे त्यांनी सांगितले. ‘जगतापांवर कोणतीही कारवाई करणार नाही’ पुरुषोत्तम जगताप यांनी पक्षाच्या अधिकृत पॅनेलविरोधात स्वतंत्र पॅनेल उभे केले असले तरी त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर जय पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “आम्ही काहीही कारवाई करणार नाही,” असे त्यांनी सांगितले. त्यामुळे जगताप यांच्या बंडखोरीनंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर तत्काळ कारवाई न करण्याची भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले. अजित पवारांच्या नावाच्या वापराबाबत पक्षाचे निर्देश दरम्यान, पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपसोबत स्वतंत्र पॅनेल उभे केल्यानंतर अजित पवार यांच्या नावाचा आणि छायाचित्राचा निवडणूक प्रचारात वापर करण्याचा मुद्दाही चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून यासंदर्भात परिपत्रक काढण्यात आले आहे. अजित पवार यांच्या कुटुंबीयांची परवानगी न घेता त्यांच्या नावाचा किंवा फोटोचा वापर करू नये, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे. जय पवार यांनीही या निर्णयाचे समर्थन केले. “अजितदादांचे नाव वापरून त्यांच्या कुटुंबाला एका बाजूला फटका देणे कोणालाही चांगले वाटणार नाही,” असे ते म्हणाले. वैयक्तिक आरोप टाळण्याचे आवाहन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरुषोत्तम जगताप आणि त्यांच्या समर्थकांकडून तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. सतीश काकडे यांच्यासारख्या नेत्यांनी जगताप यांच्यावर केलेल्या आरोपांबाबतही जय पवार यांनी थेट प्रतिक्रिया देण्याचे टाळले. “एकमेकांबद्दल काही खंत असेल तर संबंधितांनाच त्याबाबत प्रश्न विचारणे योग्य ठरेल,” अशी भूमिका त्यांनी घेतली. जय पवार यांनी निवडणुकीत वैयक्तिक टीका करण्याऐवजी कारखाना सक्षमपणे चालवणे, दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करणे आणि भविष्यात कारखान्याचा विकास करणे यावर भर देण्याचे स्पष्ट केले. अजित पवारांच्या निधनानंतर पहिलीच निवडणूक दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती परिसरातील सोमेश्वर साखर कारखान्याची ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आघाडी केली असून दोन्ही पक्षांकडून 21 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. दुसरीकडे युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पॅनेल मैदानात आहे. याचवेळी पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनेल उभे करून भाजपची साथ घेतल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी 3 पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात राहिल्याने सोमेश्वर कारखान्याची निवडणूक आता चुरशीची झाली आहे. हेही वाचा… पाणीटंचाईवर सरकारचा ॲक्शन प्लॅन:टँकर शेवटचा पर्याय, 75% पूर्ण योजना तातडीने सुरू करा,15 ऑक्टोबरपर्यंत टंचाई आराखडे पूर्ण करण्याचे गुलाबराव पाटलांचे निर्देश संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन, जलस्रोतांचे बळकटीकरण, नाला खोलीकरण व जलसंधारणाची कामे वेगाने पूर्ण करणे, 75 टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करणे आणि टँकरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर द्यावा. तसेच सर्व जिल्ह्यांचे टंचाई आराखडे 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून अनधिकृत पाणी उपसा तातडीने रोखावा, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. सविस्तर वाचा….
Source link
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील मतभेद चव्हाट्यावर:पुरुषोत्तम जगतापांचा स्वतंत्र पॅनेल, जय पवार म्हणाले, ‘अशी भूमिका घेतील असे वाटले नव्हते’