Headlines

दहावी-बारावीच्या दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ:राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय, पुढील आदेश येईपर्यंत शुल्क नाही




महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षांसाठी, पुढील आदेश येईपर्यंत या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेतले जाणार नाही. त्यांचे ऑनलाइन अर्ज शुल्क न घेता भरून घेण्याचे निर्देश मंडळाने दिले आहेत. राज्य सरकारने नुकताच राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने अनेक सवलती दिल्या आहेत, ज्यात परीक्षा शुल्क माफीचा समावेश आहे. शिक्षण मंडळाने या सरकारी निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी सर्व विभागीय सचिवांना दुष्काळग्रस्त तालुक्यातील शाळांना या निर्णयाची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना आणि पालकांना आर्थिक दिलासा मिळेल. या संदर्भात राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी सर्व विभागीय मंडळांना पत्र पाठवून महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये येणाऱ्या सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तातडीने आवश्यक त्या सूचना देण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, या संपूर्ण प्रक्रियेत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल विनाविलंब राज्य मंडळाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कासंदर्भात राज्य मंडळाकडून लवकरच सविस्तर आणि सुधारित सूचना जारी केल्या जाणार आहेत. तोपर्यंत, दुष्काळग्रस्त भागातील संबंधित विद्यार्थ्यांकडून कोणतेही परीक्षा शुल्क जमा न करता, केवळ त्यांचे परीक्षा अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया राबवण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *