![]()
बुद्ध धम्मात आषाढ पौर्णिमेपासून आश्विन पौर्णिमेपर्यंतच्या तीन महिन्यांच्या कालावधीत बुद्धविहारात वर्षावास पाळला जातो. आश्विन पौर्णिमेला म्हणजेच कोजागरी पौर्णिमेला बुद्ध धम्मात महाप्रवारणा पौर्णिमा म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. तथागत गौतम बुद्धांनी मानवाला केवळ भौतिक मालमत्तेचे नव्हे, तर सद्धम्माचे खरे वारसदार आणि हिस्सेदार होण्याची मोलाची शिकवण दिली आहे, असे प्रतिपादन कवयित्री प्रा. प्रतिभा अहिरे यांनी केले. कन्नड येथील त्रिशरण बुद्धविहारात कोजागरी आश्विन पौर्णिमेचे औचित्य साधून आणि वर्षावास समाप्तीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महिलांशी संवाद साधताना प्रा. प्रतिभा अहिरे बोलत होत्या. आपल्या मार्गदर्शनात प्रा. प्रतिभा अहिरे म्हणाल्या की, बुद्ध धम्मात सर्वच पौर्णिमांना विशेष महत्त्व आहे, परंतु आश्विन पौर्णिमेला महाप्रवारणा पौर्णिमा असे संबोधले जाते. या धम्मात आदिकल्याण, मज्झे कल्याण आणि परियोसान कल्याण, म्हणजेच आरंभी, मध्ये आणि अंतिमतः सर्वतोपरी कल्याणकारी असणाऱ्या धम्माचे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात प्रामाणिकपणे अनुसरण केले पाहिजे. बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील भाग तिसरा : आवड-नावड या धम्मपदाचे सविस्तर वाचन करून त्यांनी उपस्थितांना मौलिक विवेचन सांगितले. गौतम बुद्धांनी मानवी जीवनातील दारिद्र्य पूर्णपणे नापसंत असल्याचे स्पष्ट केले आहे. श्रावस्ती मुक्कामी अनाथपिंडिक या सावकारास उपदेश करताना बुद्धांनी सांगितले होते की, मानवाने नेहमी योग्य, सन्मार्गाच्या आणि स्वतःच्या कष्टाच्या मार्गानेच धनार्जन केले पाहिजे. कष्टाने मिळवलेल्या संपत्तीमुळे माणूस स्वतः सुखी आणि आनंदी होतो, असे प्रा. अहिरे यांनी नमूद केले. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील भाग तिसरा ः आवड-नावड या धम्मपदाचे लता अवचार यांनी वाचन केले. वर्षावास समाप्तीच्या प्रसंगी सर्वांसाठी भोजनदान करणाऱ्यांचा सत्कार वर्षावास समाप्तीच्या प्रसंगी भोजनदान दिल्याबद्दल निर्मला उजागरे यांचा प्रा. प्रतिभा अहिरे व जनाबाई जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना कल्पना अशोक जाधव, मंगल पवार, शुभांगी सिरसाठ, विमल पवार, लक्ष्मीबाई वाहूळ, मंगल कांबळे, सुशीला सातदिवे आणि सुशीला पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त करून विचार मांडले. संगीता अळींग, राधा जाधव, कमल देहाडे, गुंताताई जाधव, शिल्पा उजागरे, ताराबाई बहिरव, अनिता अमृतफळे, शुभांगी सिरसाठ, सविता बोर्डे, पुष्पा साळवे, आशा जाधव, मंदा जाधव, कल्पना मनवर, अलका गवळी, माया जाधव आणि पद्मा गजबे यांच्यासह कन्नड तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन मंगल पवार यांनी केले, तर आभार शुभांगी सिरसाठ यांनी मानले.
Source link
भौतिक मालमत्तेचे नाही, सद्धम्माचे हिस्सेदार व्हावे- प्रा. प्रतिभा अहिरे:कन्नड येथील त्रिशरण बुद्धविहारात आश्विन पौर्णिमेनिमित्त उपक्रम