![]()
शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी रविवारी पहाटे देहरे शिवारात पुन्हा फुटली. दोन दिवसांपूर्वीच नांदगाव येथे फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करून शहराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच हा प्रकार घडला. रविवारी (२५ ऑक्टोबर) पहाटे चार वाजेच्या सुमारास पाण्याच्या आणि हवेच्या दाबाने ही मुख्य जलवाहिनी पुन्हा एकदा फुटली. यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. मुळानगर येथून होणारा पाणी उपसा तातडीने थांबवण्यात आला असून, महापालिकेने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. नेमक्या पाणी वाटपाच्या वेळेतच हा बिघाड झाल्याने रविवारी रोटेशननुसार पाणी मिळणाऱ्या शहराच्या मध्यवर्ती भागात उशिराने आणि कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे सावेडी उपनगरातील ज्या भागांचा पाणीपुरवठा बंद होता, तिथे मात्र रविवारी पाणीपुरवठा करण्यात आला आहे. दुरुस्तीच्या कामामुळे शहरासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले असून, महापालिकेला पाणी वाटपाच्या वेळापत्रकात बदल करावे लागले आहेत. सद्यस्थितीत पाण्याची मोठी अडचण निर्माण झाल्याने नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करून सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. . रविवारी स्टेशन रोड परिसर, आगरकर मळा परिसर आणि विनायक नगर परिसराचा पाणीपुरवठा बंद राहिला. या भागाला आज पाणी दिले जाईल. . सोमवारी होणारा बुरुडगाव रोड, सारसनगर, माणिकनगर, टिळक रोड, भोसले आखाडा या परिसराला एक दिवस उशिराने मंगळवारी पाणीपुरवठा होणार आहे. असा आहे शहराच्या पाणीपुरवठ्यातील बदल
Source link
पाणीबाणी:जलवाहिनी फुटल्याने मध्य शहरात उशिरा-कमी दाबाने पाणीपुरवठा, 3 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा फुटली पाइपलाइन, दुरुस्ती सुरू