![]()
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांसाठी पार पडलेल्या मतदानानंतर आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला अत्यंत चुरशीच्या वातावरणात सुरुवात झाली. मात्र, पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडानगरी, बालेवाडी येथील मतमोजणी केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांनी लावलेल्या अतिरेकी नियमांमुळे आणि निर्बंधांमुळे मोठा गोंधळ उडाला. उमेदवारांच्या अधिकृत मतमोजणी प्रतिनिधींना आत प्रवेश करताना पेन, कोरे कागद, डायऱ्या, साधी घड्याळे आणि चक्क वाहनांच्या चाव्याही बाहेर काढून ठेवण्यास भाग पाडण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त झाला. या कारभारावर काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्यासह उपस्थित प्रतिनिधींनी तीव्र आक्षेप नोंदवत प्रशासनाला जाब विचारला. पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासह राज्यातील एकूण 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांतील 182 उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतपेटीतून स्पष्ट होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या 5 जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीची मोठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पेन-कागदाशिवाय नोंदी कशा करायच्या? -जयंत आसगावकर बालेवाडी क्रीडा संकुलाबाहेर उमेदवारांच्या प्रतिनिधींना पेन आणि कागद नेण्यास मज्जाव करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर यांनी माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “आज सकाळी जेव्हा आमचे अधिकृत बूथ प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर पोहोचले, तेव्हा त्यांना पेन, कागदपत्रे आणि घड्याळे बाहेरच ठेवण्याचे आदेश देण्यात आले. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी ही पसंतीक्रमावर आधारित असल्याने अत्यंत मोठी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया असते. मतमोजणीसाठी आत तब्बल 42 टेबल्स लावण्यात आले आहेत.” नोंदी ठेवणे उमेदवाराचा अधिकार “प्रत्येक टेबलवर कोणत्या उमेदवाराला पहिल्या पसंतीक्रमाची किती मते मिळाली, याची अचूक आकडेवारी नोंदवून ठेवणे आणि ताळेबंद मांडणे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसाठी अत्यंत आवश्यक असते. जर प्रतिनिधींकडे पेन आणि कागदच नसेल, तर त्यांनी मतमोजणीचा हिशेब कसा ठेवायचा? प्रशासनाने अशा पद्धतीने प्रतिनिधींना अडून ठेवणे पूर्णपणे अयोग्य आहे.” गाडी 3 किलोमीटर लांब लावली, चावी कुठे ठेवायची? प्रवेशद्वारावर पोलिसांच्या तपासणीदरम्यान प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार डिजिटल किंवा स्मार्ट वॉच तसेच मोबाईल फोन नेण्यास सक्त मनाई आहे. मात्र, पोलिसांनी साध्या काट्यांच्या (अॅनालॉग) घड्याळांनाही बंदी घातल्याने प्रतिनिधींनी संताप व्यक्त केला. बऱ्याच वेळ हुज्जत घातल्यानंतर काहींना आत प्रवेश मिळाला. चाव्या ठेवण्यासाठी जागाच नाही एका संतप्त प्रतिनिधीने प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवताना सांगितले, “पोलीस प्रशासनाचे नियोजन पूर्णपणे शून्य आहे. आम्ही वाहने तब्बल 3 किलोमीटर लांब पार्किंगमध्ये लावून चालत आलो आहोत. आता पोलीस म्हणतात की, गाडीची चावी आत नेता येणार नाही. मग आम्ही या चाव्या रस्त्यावर फेकायच्या का? बाहेर सामान ठेवण्यासाठी कोणतीही अधिकृत लॉकर व्यवस्था करण्यात आलेली नाही.” 182 उमेदवारांचे भवितव्य पणाला पुणे, नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद या विभागांतील निकालांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. पुणे विभागात 5 जिल्ह्यांतील शिक्षकांसाठी चौरंगी, तर पदवीधरसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. चोख पोलीस बंदोबस्त मतमोजणी केंद्रात कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी बालेवाडी स्टेडियम परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, ओळखपत्रांची कसून पडताळणी केल्यानंतरच संबंधितांना केंद्रात सोडण्यात येत आहे. दुपारनंतर पहिल्या पसंतीक्रमाच्या मतांचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे. ——————————————————————————- हेही वाचा… विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात: महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी? पहिला कल कोणाच्या बाजूने? महाराष्ट्र विधान परिषदेच्या ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांसाठी शुक्रवारी पार पडलेल्या चुरशीच्या मतदानानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून, दुपारपर्यंत पहिले कल हाती येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीने आपली पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली असून, कुणाला धक्का बसणार आणि कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सविस्तर वाचा
Source link
42 टेबलांवर मतमोजणी, मग उमेदवारांनी नोंद कशी ठेवायची?:पेन, कागद, घड्याळ अन् गाड्यांच्या चाव्याही अडवल्या; बालेवाडी केंद्रावरील निर्बंधांवरून आसगावकरांचा संताप