Headlines

मंत्री जयकुमार गोरेंचा ताफा अडवला:मराठा आंदोलकांचा थेट गाडीखाली घुसण्याचा प्रयत्न, मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ राज्यभरात संतापाची लाट




मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाचा आज चौथा दिवस असून, त्यांची तब्येत खालावत असल्याने राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धाराशिवमध्ये मराठा बांधवांनी सामाजिक न्याय विभागाच्या उंच इमारतीवर चढून आंदोलन केले, तर सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा ताफा अडवत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. माढा तालुक्यातील टेभुर्णी येथे चार ते पाच आंदोलकांनी थेट ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या गाडीसमोर आडवे झोपून गाडीखाली घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी गाडीमध्ये त्यांच्यासोबत माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेदेखील उपस्थित होते. माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याला जात असताना हा प्रकार घडला असून, आंदोलकांनी ‘एक मराठा लाख मराठा’ आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांचा तातडीने हस्तक्षेप आंदोलक गाडीखाली घुसण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. गाडीसमोर आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताकदीने बाजूला केल्यानंतर पालकमंत्र्यांचा ताफा पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाला. या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यातील मराठा बांधवांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली असून, अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस प्रशासनही अधिक सतर्क झाले आहे. मंत्र्यांची पोलिस अधीक्षकांशी चर्चा ताफा अडवण्याच्या या आक्रमक प्रकारानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे अधिक सतर्क झाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलकांना बाजूला सारून माजी आमदार बबन शिंदे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला पोहोचल्यानंतर, त्यांनी मंचावर उपस्थित असलेल्या सहाय्यक पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्याशी या संपूर्ण घटनेसंदर्भात तातडीने आणि सविस्तर चर्चा केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *