![]()
पुणे शहरातील कोंढवा परिसरातून पोलिसांनी अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्यांच्याकडून हायड्रोपोनिक गांजा आणि मेफेड्रोन असे सुमारे आठ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. पोलिसांना कोंढव्यातील अजमेरा पार्क सोसायटी रस्त्यावर एक जण दुचाकीवरून अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अमीर अकबर शेख (वय ३६, रा. एल. के. अपार्टमेंट, अजमेरा पार्क, कोंढवा) याला पकडले. त्याच्या झडतीमध्ये पोलिसांना ५ लाख २१ हजार रुपयांचा १२९ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा मिळाला. याशिवाय, रोकड, दुचाकी, इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि प्लास्टिक पिशव्या असा एकूण ५ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कोंढवा भागातच पोलिसांनी आणखी एका कारवाईत मेफेड्रोन विक्री करणाऱ्या अजीम सलीम शेख (वय ३७, रा. काशेवाडी, भवानी पेठ) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ लाख ४२ हजार रुपयांचे १२ ग्रॅम मेफेड्रोन, रोकड, मोबाइल संच आणि इंजेक्शन सिरीज असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी कोंढवा परिसरात अमली पदार्थ तस्करी किंवा विक्रीचे प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर आणि सहायक आयुक्त रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रशांत मंडले, संतोष चौधरी, उपनिरीक्षक महेंद्र डोके, उपनिरीक्षक रवींद्र गावडे, सागर पवार, पोलीस कर्मचारी अमोल हिरवे, रवींद्र चिप्पा, केशव हिरवे, कानिफनाथ कारखेले, अमित सूर्यवंशी, रशीद शेख, राहुल रासगे आणि रिजाय पटेल यांचा समावेश होता.
Source link
कोंढव्यात दोघांकडून हायड्रोपोनिक गांजा, मेफेड्रोन जप्त:पोलिसांनी 8 लाख रुपयांचे अमली पदार्थ, रोकड आणि इतर साहित्यही केले जप्त