![]()
आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी मेळघाट दौऱ्याच्या अनुषंगाने चिखलदरा तालुक्यातील तारुबांदा गावास सोमवारी भेट दिली. यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या आशेने मंत्र्यांपुढे गावातील गंभीर पाणीटंचाई तसेच खराब झालेल्या रस्त्यांची समस्या मांडत निवेदन सादर केले. तारुबांदा गावात अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली असून, येथील प्रसिद्ध कांदरी बाबा देवस्थानास (क) दर्जा मिळालेला असून, या पवित्र स्थळाच्या सौंदर्यीकरणासह सर्वांगीण विकास व्हावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली. देवस्थान परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी तसेच डीपीटीसी अंतर्गत निधी उपलब्ध करून भाविकांसाठी सुसज्ज भक्तनिवास उभारण्यात यावे, कांदरी बाबा देवस्थानाच्या विकासामुळे परिसरातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली. त्या सोबतच महिलांना व नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याची व्यथा ग्रामस्थांनी सांगितली. ग्रामस्थांच्या समस्या शांतपणे ऐकून घेत उईके यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या भेटीदरम्यान स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मंत्र्यांच्या गाव भेटीमुळे गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभूदास भिलावेकर, मेळघाट विधानसभा क्षेत्राचे आ. केवलराम काळे, सदाशिव खडके, सुधीर रसे यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. चिखलदरा आणि धारणी हे आदिवासी बहूल तालुके दत्तक घेतलेले आहेत. त्यामुळे या भागाच्या विकासकामांना गती देऊन नागरिकांच्या मुलभूत समस्या दूर करण्यासाठी प्रकल्प कार्यालयाने सर्व विभागांशी समन्वय ठेवावा. यामुळेच त्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे मत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केले. या बैठकीत कुपोषण, सिकलसेल, थॅलेसेमिया आणि क्षयरोग या गंभीर विषयांवर स्वतंत्रपणेचर्चा करण्यात आली. आदिवासी भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची आवश्यकता, वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे आणि उपचार सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
Source link
मंत्र्यांना आदिवासी नागरिकांनी दाखवल्या मेळघाटातील समस्या:डाॅ. उईके यांनी दिले तत्काळ समस्या सोडवण्याचे आश्वासन