![]()
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. अंतरवाली सराटीत सुरू झालेल्या या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असून, रात्री उशिरापर्यंत मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी दाखल होत आहेत. पहाटे ३ वाजेपर्यंतही आंदोलकांची ये-जा सुरू होती. अनेक आंदोलकांनी आंदोलनस्थळीच मुक्काम केला असून, पुढील काही दिवस अंतरवालीत थांबण्याची तयारी केल्याचे चित्र आहे. आंदोलनाचा दुसरा दिवस; सरकारच्या भूमिकेकडे लक्ष मनोज जरांगे पाटील यांच्या अकराव्या आमरण उपोषणाला कालपासून सुरुवात झाली. उपोषणापूर्वी त्यांनी मराठा समाजाने मोठ्या संख्येने घराबाहेर पडून आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते. त्यानंतर अंतरवाली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढत आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या चर्चेत अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी सरकार आणि जरांगे यांच्यात काही तोडगा निघणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विखे पाटील पुन्हा मध्यस्थी करणार? मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारकडून पुन्हा एकदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मध्यस्थी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला होता. त्यामुळे आगामी काळात सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी विखे पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. तोडगा न निघाल्यास मुंबई आंदोलनाचा इशारा मागण्या मान्य न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा अधिक तीव्र करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. सरकारने ठोस निर्णय घेतला नाही, तर १२ सप्टेंबरला मुंबईतील आंदोलनाची तारीख निश्चित केली जाईल, अशी भूमिका आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मांडण्यात आली आहे. दरम्यान, अंतरवाली सराटीत आंदोलकांची संख्या वाढत असल्याने प्रशासन आणि पोलिसांकडूनही परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. पुढील काही दिवसांत आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता असून, सरकार या प्रश्नावर कोणता निर्णय घेते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यातील जात पडताळणी समित्याच रद्द करा – जरांगे देशात कुठेच जात पडताळणी समित्या नाहीत, मग त्या महाराष्ट्रातच का? या समितीची आवश्यकता आणि कार्यपद्धतीबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घेऊन या समित्या रद्दच कराव्यात, अशी मागणी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी केली. जात समिती फक्त महाराष्ट्रातच असल्याची माहिती मला भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली, असा दावा त्यांनी केला. १२ सप्टेंबरला मुंबईत धडक मारण्याची तारीख जाहीर करू. हे आंदाेलन ५ टप्प्यांत होईल, असेही जरांगे म्हणाले. दरम्यान, जरांगेंच्या दाव्यासंदर्भात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. तर जात समिती रद्द करण्याच्या जरांगेंच्या मागणीस मंत्री छगन भुजबळ, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी कडाडून विरोध केला आहे. तर गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह काही नेते जरांगेंच्या आंदोलनाला अप्रत्यक्ष पाठिंबा देत आहेत. फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मराठेतर समाजाचे नेतृत्व करतात. त्यामुळे जातीय आकसातून त्यांना लक्ष्य केले जात आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी शनिवारपासून ११ वे उपोषण सुरू करणारे जरांगे म्हणाले की, ५८ लाख कुणबी नोंदींची अंमलबजावणीवरून सरकारमध्येच अंतर्गत षडयंत्र सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपत श्रेयाची लढाई सुरू आहे. म्हणून आता आश्वासन नको. प्रत्यक्ष कार्यवाही हवी. कुणबी नोंदींची संख्या कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी चार कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली. प्रलंबित अर्ज निकाली काढून कुणबी प्रमाणपत्रांना जात वैधता द्यावी, हैदराबाद गॅझेटनुसार प्रक्रिया राबवावी. जीआरची अंमलबजावणीच होत नसेल, तर शांततेची मर्यादा सरकारनेच भंग केली आहे. यावर आता आंतरवाली सराटीतच सरकारने तोडगा काढावा, अन्यथा हे आंदोलन मुंबईत नेऊ. मराठ्यांच्या पोरांना हात लावाल तर मराठा समाजाची ताकद जगाला दाखवू, असा इशाराही जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिला. काही समन्वयक सरकार आणि आंदोलनाचीही बाजू ऐकत आहेत. त्यांनी आंदोलनाच्या भूमिकेवर ठामपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले की, शेवटचा लढा व ओबीसींचा आरक्षण गाडा, असे धोरण मनोज जरांगे यांचे आहे. अपात्र प्रमाणपत्रे वैध करून घेण्याचा हा प्रयत्न आहे. आता ओबीसी एकत्र आले नाहीत, तर भविष्यात काहीही शिल्लक राहणार नाही. १२ सप्टेंबरला मुंबईत धडक मारण्याची तारीख जाहीर करणार आंतरवालीत शनिवारी बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी जिल्ह्यासह गोदाकाठच्या गावातील मराठा बांधव उपस्थित होते. वेळेत मागण्या मान्य न केल्यास मुंबईत धडकण्याचा इशारा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिला. नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन्स सेंटर, कांदा-बटाटा मार्केट, फूड मार्केट आणि भारती विद्यापीठ कॉलेज परिसरात सुमारे २५ हजार बांधवांच्या निवासाची सोय केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. हेही वाचा.. ओबीसींना मोठा झटका:1 सप्टेंबरच्या आंदोलनाला परवानगी नाकारली, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय ओबीसी समाजाच्या वतीने १ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात प्रस्तावित करण्यात आलेल्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आंदोलनासाठी मल्लिकार्जुन पुजारी यांच्या नावाने पोलिसांकडे अर्ज करण्यात आला होता. मात्र, आझाद मैदान पोलिसांनी विविध कारणे नमूद करत आंदोलनास परवानगी देण्यास नकार दिला आहे. सविस्तर वाचा
Source link
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस:12 सप्टेंबरला मराठा समाजाची बैठक, मुंबईतील आंदोलनाची घोषणा करण्याचा इशारा, विखे पाटील पुन्हा मध्यस्थी करणार?