Headlines

मनोज जरांगेंच्या प्रयत्नांना मोठे यश:मराठा आरक्षण आंदोलनातील 34 मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाखांची मदत, सरकारची घोषणा




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने शुक्रवारी मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील 34 मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यात मोठे आंदोलन छेडले आहे. या प्रकरणी विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनात तब्बल 309 जणांचा बळी गेला होता. राज्य सरकारने या बळींच्या वारसांना मदत करण्यासाठी 27 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पण यापैकी 34 व्यक्तींच्या कुटुंबांना अद्याप एक रुपयाचीही मदत मिळाली नव्हती. मनोज जरांगे यांनी आपल्या आंतरवाली सराटी येथील आंदोलनावेळी हा मुद्दा प्रकर्षाने उपस्थित केला होता. त्यावर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या प्रकरणी ठोस निर्णय घेण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार, आज राज्य सरकारने या 34 बळींच्या कुटुंबीयांना तातडीने मदत करण्याचा निर्णय घेतला. 34 कुटुंबांसाठी 3 कोटी 40 लाखांचा निधी मंजूर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निर्णयाविषयी बोलताना सांगितले की, राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलनात बळी गेलेल्या 34 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 3 कोटी 40 लाख रुपयांचा निधी तातडीने मंजूर केला आहे. या निधीद्वारे बीड जिल्ह्यातील 15, धाराशिव जिल्ह्यातील 5, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी 4, नांदेड 3, तर जालना, छत्रपती संभाजीनगर व लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी एका कुटुंबाला मदत केली जाईल. सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्यावर दिलेली सर्वच आश्वासने पूर्ण करण्यास कटिबद्ध आहे. आत्ता पाहू काय म्हणाले होते फडणवीस? मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यात त्यांनी सरकार मराठा समाजाला न्याय देण्यासाठी तत्पर असल्याचे स्पष्ट केले होते. सरकारने मनोज जरांगे यांना जी काही आश्वासने दिली ती सर्वांसमोर दिली. कोणतेही आश्वासन माध्यमांच्या माघारी दिले नाही. आम्ही दिलेली आश्वासने मनोज जरांगे यांनी स्वतः वाचून दाखवली आहेत. आमच्या सरकारने सातत्याने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसार, कारवाईही केली आहे, असे ते म्हणाले होते. जरांगेंनी भर उन्हात केले होते उपोषण उल्लेखनीय बाब म्हणजे मनोज जरांगे यांनी गत 30 तारखेला सकाळी 9.30 वा. भर उन्हात उपोषण सुरू केले होते. त्यानंतर दिवसभर सरकारचे शिष्टमंडळ व मनोज जरांगे यांच्यात चर्चा सुरू झाली होती. सरकारकडून हे उपोषण मागे घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले गेले. त्यानंतर मनोज जरांगे यांनी मध्यरात्री 1 वाजता उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली. तत्पूर्वी, सरकारने आपल्या सर्वच प्रमुख मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *