![]()
मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मोर्चाने दिला आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक तातडीने घेण्यासह अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची थकीत रक्कम तत्काळ वितरित करण्याची प्रमुख मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली. यावेळी मराठा आरक्षण, समाजातील तरुणांचे रोजगार व शैक्षणिक प्रश्न, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांच्या अडचणी, कुणबी दाखले आणि जातवैधता प्रमाणपत्रांसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून अनेक तरुणांनी कर्ज घेऊन उद्योग सुरू केले आहेत. मात्र, व्याज परताव्याची रक्कम वेळेत मिळत नसल्याने त्यांचे कर्जखाते थकीत होत आहे. याचा परिणाम त्यांच्या ‘सिबिल’ गुणांकनावरही होत असल्याने, महामंडळाला आवश्यक निधी उपलब्ध करून लाभार्थ्यांच्या खात्यात थकीत व्याज परताव्याची रक्कम तातडीने जमा करावी, अशी मागणी करण्यात आली. मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून देण्यात आलेले आरक्षण न्यायालयात टिकले पाहिजे. यासाठी राज्य सरकारने कायदेशीर पातळीवर सक्षमपणे बाजू मांडून आवश्यक ती पूर्वतयारी करावी, असे निवेदनात नमूद केले आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची दीर्घकाळ बैठक झालेली नसल्याने ती तातडीने आयोजित करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. राज्यात सुरू असलेली कुणबी नोंदी शोधमोहीम अधिक प्रभावीपणे राबवून पात्र मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात यावीत, अशी मागणीही मोर्चाने केली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील करीत असलेल्या आंदोलनामागील समाजाच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यात आल्या असून, मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
Source link
मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला आंदोलनाचा इशारा:समाजाचे प्रश्न, आरक्षण उपसमिती बैठकीची मागणी