Headlines

अमित ठाकरेंसह मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल:शासकीय तंत्रनिकेतनमध्ये गोंधळ, पंतप्रधानांचा फोटो काढल्याचा आरोप




महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्यासह २० ते २५ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय तंत्रनिकेतन, गणेशखिंड येथील कार्यालयात विनापरवाना प्रवेश करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढून नेल्याचा आणि अधिकाऱ्यांना धमकावून घोषणाबाजी करत गोंधळ घातल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी (३१ ऑक्टोबर) दुपारी साडेबारा ते सव्वाएकच्या दरम्यान शासकीय तंत्रनिकेतन, गणेशखिंड येथे घडली. या प्रकरणी डॉ. राजेंद्र पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, अमित ठाकरे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने तंत्रनिकेतन परिसरात जमा झाले होते. त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून महाविद्यालयाच्या कार्यालयात विनापरवाना प्रवेश केला. तक्रारीत नमूद केल्यानुसार, कार्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढून घेण्यात आला. तसेच फिर्यादी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धमकावण्यात आले. कार्यालयात काही काळ थांबून जोरजोरात घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्याने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अमित राज ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या २० ते २५ अनोळखी व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३२९(३), १८९(१), ४६, २२३ आणि ३४(२) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम १२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमागील नेमका वाद काय होता, कार्यालयात प्रवेश करण्यामागचे कारण काय होते आणि पंतप्रधानांचा फोटो काढून नेण्याच्या आरोपाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, याचा तपास चतुःशृंगी पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे पुण्यात राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात चर्चा सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *