Headlines

समृद्धीवर पुन्हा दरोडा, बंदुकीचा धाक दाखवून अभियंत्याची कार पळवली:दरोडेखोरांनी 30 हजार रुपयांसह मोबाइल, एटीएम कार्डही लांबवले




समृद्धी महामार्गावर पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून मुंबईला जाणाऱ्या एका कार्यकारी अभियंत्याची इनोव्हा कार, ३० हजार रुपये रोख व मोबाइल लुटण्यात आले. या गुन्ह्यातील एका आरोपीला सिडको पोलिसांनी टीव्ही सेंटर चौकातून ताब्यात घेतले. २ नोव्हेंबर रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास ठाणे जिल्ह्यातील शहापूर हद्दीतील चॅनल क्रमांक ६९१ जवळ हा दरोडा टाकण्यात आला होता. मुंबई येथे मृदा व जलसंधारण विभागातील कार्यकारी अभियंता फरीद खान हे इनोव्हा कारने (एमएच ०२ ईएच ५०१९) चालक कृष्णा बाविस्कर यांच्यासह छत्रपती संभाजीनगर येथून मुंबईला जात होते. शहापूर हद्दीत चॅनल क्रमांक ६९१ जवळ पांढऱ्या रंगाच्या कारमधून (एमएच २० एचएन ६३७७) आलेल्या ४ ते ५ मास्कधारी दरोडेखोरांनी त्यांची कार अडवली. त्यांनी चालकाला पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून खाली उतरवत खान यांना धमकावून त्यांच्याजवळील ३० हजार रुपये रोख, मोबाइल आणि एटीएम कार्ड हिसकावून घेतले. त्यानंतर आरोपी इनोव्हा घेऊन पसार झाले. घटनेनंतर खान यांनी दुसऱ्या मोबाइलवरून जीपीएसद्वारे गाडीचे लोकेशन तपासले असता, ती खुटघर टोलनाक्याजवळ नागपूर वाहिनीवर आढळून आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन रिकामी गाडी ताब्यात घेतली. याप्रकरणी कल्याण तालुका पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे विविध कलमान्वये तसेच शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. ६ महिन्यांत ‘समृद्धी’वर लुटमारीच्या ५ घटना १२ मे : वैजापूर हद्दीत कार अडवून प्रवाशांची लूट.
२८ जुलै : सिंदखेड राजाजवळ टायर पंक्चर करून रोकड पळवली.
१५ ऑगस्ट : छत्रपती संभाजीनगर हद्दीत चाकूच्या धाकाने लूट.
२८ ऑगस्ट : महामार्गावर सिन्नर येथे खिळे टाकून टायर पंक्चर करून संभाजीनगरातील वकील कुुटुंबाचा १८ लाखांचा ऐवज लुटला
२ नोव्हेंबर : ठाणे जिल्ह्यात कार्यकारी अभियंत्याला लुटले. सिडको पोलिसांची कारवाई संशयित संभाजीनगरात असल्याची तांत्रिक माहिती मिळताच सिडको ठाण्याचे उपनिरीक्षक सोपान नरळे आणि गुन्हे शोध पथकाने वाहतूक पोलिसांच्या मदतीने टीव्ही सेंटर चौकातून एका आरोपीला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिस प्रमुखांचा ‘कॉन कॉल’ दरोड्याच्या माहिती समजताच राज्यभरातील पोलिस यंत्रणा गतिमान झाली. ठाणे पोलिस आयुक्त, ठाणे ग्रामीण अधीक्षक, नाशिक पोलिस आयुक्त, नाशिक ग्रामीण अधीक्षक, तसेच संभाजीनगरचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार व ग्रामीण अधीक्षक प्रकाश जाधव यांनी ‘कॉन्फरन्स कॉल’ घेतला. त्यांनी आरोपींचे तांत्रिक लोकेशन आणि माहितीची देवाणघेवाण केली. याच अचूक तांत्रिक तपासाआधारे सिडको पोलिसांनी काही तासांतच टीव्ही सेंटर परिसरातून मुख्य संशयिताला जेरबंद केले. तर ठाणे पोलिसांच्या एका पथकाने रविवारी रात्री उशिरा करमाड (जि. छत्रपती संभाजीनगर) हद्दीतून आणखी ३ ते ४ संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *