Headlines

प्रशासन अलर्ट:कुंभमेळ्याची गर्दी साईनगरीकडे; शिर्डीत सुविधांचा ‘मास्टर प्लॅन’!, नाशिक-त्र्यंबकेश्वरहून शिर्डीसाठी विशेष वातानुकूलित बससेवा प्रस्तावित




नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचा प्रारंभ झाल्याने साईनगरी शिर्डीतही भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. कुंभमेळ्यासाठी येणारे भाविक साईदर्शनासाठी शिर्डीकडे वळणार असल्याने सुरक्षा, वाहतूक आणि दर्शन व्यवस्थेचे नियोजन आतापासूनच करा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले. गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांनी २४ तास कार्यरत राहणारी कमांड सिस्टीम उभारावी, अशी सूचनाही त्यांनी केली. शिर्डीतील श्री साईबाबा मंदिर परिसरातील झिरो सभागृहात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांची आढावा बैठक झाली. नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्यासह नगरसेवक व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरहून शिर्डीसाठी विशेष इलेक्ट्रिक वातानुकूलित बससेवा सुरू करण्याबाबत नियोजन करावे, असे विखे पाटील यांनी सांगितले. शहरातील प्रमुख चौक, बसस्थानक, रेल्वेस्थानक, विमानतळ, मुख्य रस्ते आणि मंदिर परिसरात सीसीटीव्ही व ध्वनिक्षेपक यंत्रणा उभारून गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रस्ताव पोलिसांनी तातडीने सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. कुंभमेळ्याच्या पर्वणी काळात लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मुख्य महामार्ग व जोडरस्त्यांचे रुंदीकरण वेगाने पूर्ण करावे. शहराबाहेर वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग उभारावे. मंदिर परिसरात दर्शन रांगा, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि प्रथमोपचार केंद्रांची व्यवस्था वेळेत पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले. शिर्डीचा विकास भविष्यातील वाढती गर्दी लक्षात घेऊन करावा. नगरपालिका, बांधकाम, रस्ते विकास महामंडळ, महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाने समन्वयाने काम करावे. समाजमाध्यमे, रिल्स आणि भाविकांच्या माध्यमातून शिर्डीच्या दर्शनासाठी अधिकाधिक भाविकांना आकर्षित करण्याचे आवाहनही संस्थानला करण्यात आले. कोणत्याही भाविकाची गैरसोय होऊ नये आणि कामांच्या दर्जात तडजोड होऊ नये, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. . शहरातील प्रमुख चौकांत सीसीटीव्ही यंत्रणा .बसस्थानक, रेल्वेस्थानक व विमानतळावर लक्ष . मंदिर परिसरात ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना . गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांचा चोवीस तास नियंत्रण कक्ष . कमांड सिस्टीमचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *