![]()
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सोमवारी विक्रमी ९९.२७ टक्के मतदान झाले. एकूण ३ हजार ८३७ मतदारांपैकी ३ हजार ८०९ जणांनी मताधिकार बजावला. २०२१ च्या निवडणुकीत सरासरी ९८ टक्के मतदान झाले होते. त्यापेक्षा यंदा मतांचा टक्का वाढला. यावरून उमेदवारांनी प्रत्येक मत आपल्या बाजूने वळवण्यासाठी किती जोर लावला, हे स्पष्ट होते. आता मंगळवारी सकाळी नऊ वाजता सुरू होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पहिल्या टप्प्यात विकास सोसायट्यांचा निकाल मोजणी सुरू होताच अवघ्या अर्ध्या तासात हाती येण्याचा अंदाज आहे. दरम्यान, मतपत्रिकेचे चित्रीकरण केल्याप्रकरणी संगमनेरात गोंधळ निर्माण झाला होता. बँकेच्या २१ जागांपैकी ११ जागा बिनविरोध करण्यात विखे-थोरात आघाडीला यश आले. मात्र २०२१ मध्ये २१ पैकी १७ जागा बिनविरोध झाल्या होत्या. यंदा तो आकडा सहाने घटला आणि लढतीच्या जागा चारवरून दहावर गेल्या. उर्वरित चार सोसायटी मतदारसंघ आणि सहा राखीव जागांसाठी सकाळी आठ वाजल्यापासून मतदान झाले. केंद्र परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. जिल्ह्याचे सर्वाधिक लक्ष पारनेरवर होते. येथे खा. नीलेश लंके (लंके-लोखंडे गट) आणि डॉ. सुजय विखे यांचे निकटवर्तीय राहुल शिंदे (आघाडी) यांच्यात काट्याची टक्कर आहे. विखे यांनी येथे स्वतः लक्ष घातल्याने लंके अधिक सतर्क झाले. विखे-लंके यांच्यातील वितुष्ट लपून राहिलेले नाही आणि बँकेच्या निमित्ताने ते पुन्हा समोर आले. म्हणूनच पारनेरच्या मतपेट्यांसोबत पोलिस बंदोबस्ताबरोबरच लंके यांच्या कार्यकर्त्यांचाही ताफा अमरज्योत लॉन येथे दाखल झाला. स्ट्राँगरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असली, तरी लंके यांचे कार्यकर्ते तेथे गस्त घालणार आहेत. निवडणूक अधिकारी मंगेश सुरवसे, सहायक निवडणूक अधिकारी देविदास घोडेचोर आणि भाऊसाहेब खेडकर यांनी मतमोजणी केंद्र व स्ट्राँगरूमची पाहणी करून आढावा घेतला. चुरशीच्या लढती : पारनेर : खा. नीलेश लंके (लंके-लोखंडे गट) यांच्या विरोधात राहुल शिंदे (विखे-थोरात-गडाख आघाडी) यांच्यात काटे की टक्कर आहे. राहुरी : आ. प्राजक्त तनपुरे (आघाडी) यांच्यासमोर सत्यजित कदम (अपक्ष) यांचे आव्हान आहे. अकोले : आ. किरण लहामटे आणि संजीवनी शिंदे हे दोघेही रिंगणात आहेत. कर्जत : तुषार पिसाळ यांच्या विरोधात ज्योती शिंदे (राम शिंदे गट) आहेत. राखीव जागांवर मातब्बरांची कसोटी महिला राखीव (दोन जागा) : आघाडीतर्फे अनुराधा नागवडे व संगीता वाघ हे दोन्ही आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर हर्षदा काकडे व संध्या महांडुळे यांचे आव्हान आहे. उत्तरेतील संगमनेर व कोपरगाव तालुक्यातील सर्वाधिक मते कोणाच्या पारड्यात याकडे लक्ष. अनुसूचित जाती-जमाती : आघाडीचे वैभव पिचड आणि लंके-लोखंडे गटाचे प्रशांत लोखंडे यांच्यात सरळ आहे. पण या ठिकाणी पिचड यांनी शेवटपर्यंत पकड मजबूत ठेवण्याचा प्रयत्न केला. भटके-विमुक्त : आघाडीचे गणपतराव सांगळे विरुद्ध ऋषिकेश ढाकणे आदी. शेतीपूरक : आ. आशुतोष काळे (आघाडी) आणि सुधीर म्हस्के (लंके-लोखंडे गट) यांच्यात सरळ झुंज पाहायला मिळेल. ओबीसी : जागेवर कारभारी जावळे विरुद्ध जालिंदर वाकचौरे अशी लढत होईल. मतमोजणीची तयारी अशी मतमोजणी केंद्र अमरज्योत लॉन येथे असून, मतपेट्यांची स्ट्राँगरूमही तिथेच आहे. पोलिस बंदोबस्तात आणलेल्या मतपेट्या सुमारे पाऊण तास गाडीतच ठेवण्यात आल्या. चित्रीकरण करणारा कर्मचारी आल्यानंतर त्या बंदोबस्तात स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या. मंगळवारी सकाळी नऊ वाजता मोजणी सुरू होईल. एकूण १४ टेबल असून, चार सेवा सोसायटी मतदारसंघांची मोजणी एकाच वेळी होईल आणि त्यांचा निकाल अर्ध्या तासात हाती येईल. मोजणीचा क्रम असा असेल: आधी सोसायट्या, नंतर शेतीपूरक, मग महिला राखीव दोन जागा आणि शेवटी उर्वरित राखीव जागा. दुपारी बारापर्यंत सर्व निकाल हाती येण्याची अपेक्षा आहे.
Source link
आज अर्ध्या तासांत पहिला निकाल! 99.27% मतदान:मतमोजणी केंद्रावर पोलिस बंदोबस्तात पेट्या दाखल, संगमनेरात मतपत्रिकेच्या चित्रीकरणाने गाेंधळ